सातारा / प्रतिनिधी :
पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग भलताच सक्रिय झाला आहे. आदेश मिळताच काही क्षणात कारवाईच्या ठिकाणी हजर होतो अन् कारवाईला सुरुवात करतो. या विभागाकडे असलेल्या ठेक्याच्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी पगार नव्हता. ती समस्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे मांडली होती. त्यांच्याकडून प्रयत्नही झाला अन् ही टीम कामाला लागली. आज या टीमने शहरातील विना परवाना लावलेले फ्लेक्स काढले.
पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे जे कर्मचारी कार्यंरत आहेत. त्यांचा करार संपला होता. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी दिले जाणारे मानधन मिळत नव्हते. त्यामुळे कर्मचारी कामावर असूनही त्यांच्या मानधनाचा प्रश्न सुटत नव्हता. कामामध्ये हे पथक लगेच तयार असते. वरीष्ठांनी आदेश देताच पथक कारवाईला लगेच हातोडा घेवून तयार असते.
असेच शहरातील विना परवाना लावलेल्या फ्लेक्स प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळताच आज सकाळी हे पथक आरोग्य विभागाकडे असलेली निळी गाडी घेवून साताऱ्यातले विना परवाना फ्लेक्स हटवण्याच्या मोहिमेवर गेले. जो फ्लेक्स परवानगी विना दिसेल तो त्यांनी काढला. पालिकेत फ्लेक्स लावण्याची परवानगी देण्याचे कामही अतिक्रमण हटाव विभागाकडेच असते. याबाबत अतिक्रमण हटाव विभाग आदेशाचे पक्के बांधिल आहे.









