इच्छूकांच्या पायघडय़ा, कोणाला मिळणार पुन्हा संधी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या विषय समित्यांच्या मुदती दि.3 रोजी संपत आहेत. नव्याने निवडीचा कार्यक्रम काल रात्री उशीरा काढला असून त्याकरता आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेची नोटीस नगरसेवकांना व्हॉट्सऍपद्वारे मिळाली आहे. सोमवार दि. 11 रोजी ही सभा होत आहे. स्थायी व विषय समितीवर आपलीच निवड व्हावी यासाठी काही साविआतील नगरसेवकांनी नेत्यांच्या पायघडय़ा सुरु केल्या आहेत. तर सातारा विकास आघाडीमध्ये विद्यमान विषय समितीमध्ये कोणाला पुन्हा संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये विशेष करुन आरोग्य सभापतींना पुन्हा संधी द्यावी अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा पालिकेतील विषय समितीच्या निवडीचा कार्यक्रम काल सांयकाळी उशीरा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवकांना दिलेल्या नोटीसीमध्ये स्पष्टच नमूद केले आहे की विषय समिती सदस्य व सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवार दि. 11 रोजी ऑन लाईन व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे होणार आहे. 11 ते 11.30 या दरम्यान अर्ज दाखल करणे, 11.45 पर्यंत छाननी, 12 पर्यंत अर्ज मागे घेणे, 12.15 ला सभापती पदासाठी अर्ज स्वीकारणे, त्यानंतर छाननी, 1 वाजता निवडी जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सातारा पालिकेत सध्या असलेल्या बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांना पुन्हा संधी दिली जात आहे पण ते घेत नाहीत. तर आरोग्य सभापती असलेल्या अनिता घोरपडे यांना पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी केसरकर पेठ, माची पेठेतील नागरिकांकडून होवू लागली आहे. तसेच इतर सातारा विकास आघाडीतील कोणकोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. अनेकांनी आपली इच्छाही नेत्यांकडे व्यक्त केली आहे. पालिकेचे सातारा विकास आघाडीचे ऍड. बनकर यांच्याकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हेच अजून ठरले नाही. मात्र, अनेकांनी फिल्डींग नेत्यांकडे लावली असल्याची चर्चा आहे.









