सातारा / प्रतिनिधी :
सातारा पालिकेच्या विषय समितीच्या सभापतींचा कार्यकाळ 3 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे नव्याने सभापती बनण्यासाठी अनेकांनी गुडघ्यांना बाशिंग बांधून तयारी सुरु केली आहे. सभापती बदलांच्या हालचाली सध्या सुरु असल्याची जोरदार चर्चा असून दि.10 जानेवारीपर्यंत सभापती निवडीच्या अनुषंगाने विशेष सभा निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या सभापतींची सुमार दर्जाची कामगिरी आहे. त्यांच्याबाबत नेत्यांकडे नाराजीचा सुर आहेच परंतु, आगामी सातारा पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सातारा विकास आघाडीतल्या कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सातारा पालिकेच्या बांधकाम, नियोजन, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण व मागासवर्गीय समाजकल्याण निवड गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेली होती. 3 जानेवारीला मुदत संपत असल्याने नव्याने निवडी होण्याकरता सातारा विकास आघाडीत हालचाली सुरु आहेत. सातारा विकास आघाडीने सुरुवातीच्या वर्षात आरोग्य खाते अण्णा लेवे यांच्याकडे दिले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य विभागाचा गाढा चांगल्या प्रकारे चालवला. त्यांच्या नंतरचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनीही चांगले काम केले. पाणी पुरवठा सभापतीपदाची धुरा त्यावेळी श्रीकांत आंबेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनीही चांगल्या प्रकारे पाणी पुरवठय़ांच्या समस्या सोडवल्या.
विद्यमान सभापती नारकर हे सध्या आजारी असल्याने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पाणी पुरवठय़ामध्ये लक्ष घातले आहे. बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांची साधी रहाणी असल्याने व काम एके काम एवढेच करत असल्याने नेत्यांकडून त्यांना मुदत वाढ देण्याची विनंती केली. परंतु पालिकेतील तऱ्हा त्यांना वारंवार खटकत असल्याने त्यांनी पुन्हा मुदतवाढ नको असे स्पष्ट सांगितले आहे.
पाणी पुरवठा, आरोग्य हे दोन मलईदार विभाग नक्की कोणाकडे वर्णी लागणार, कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाचे काम कसे झाले हे सर्व सातारकरांना ज्ञात आहे. तर महिला व बालकल्याण विभाग व मागासवर्गीय समाजकल्याण समितीची सभापतींचे कामकाजाबाबत नेमके काय काम होत आहे, हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी पालिकेच्या निवडणूका आहेत. त्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात सातारा विकास आघाडीची दमदार छाप उमटवणारे सभापती हवेत, याकरीता नेमके कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरु असून, या निवडीकरता दि.10 पर्यंत विशेष सभा लागण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा सुरु आहे.









