प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेत आओ जाओ घर तुम्हारा अशी गत झाली आहे. कोरोनामुळे सवलत दिल्यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेच भान नसते. त्यामुळे सातारा पालिकेत मंगळवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक पोहचले. कोण साडे दहा कोण पावणे अकरा वाजता पालिकेत आले मग अशा लेट लतिफांवर त्या पथकांकडून कारवाई करण्यासाठी शेरे मारण्यात आले. हजेरी पुस्तकावर शेरा मारल्यामुळे मंगळवारी दिवसभर पालिकेत एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी सगळे वेळेत हजर झाल्याचे दिसत होते.
कोरोनाच्या काळात पालिकेत सवलतच सवलत दिली जात होती. पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत काम करत असत. उशीरा आले तरीही हजेरी पत्रकावर वेळेतच हजेरी लागत होती. पालिकेमध्ये कर्मचाऱयांकडून वेळेचा नियम मोडला जाग होता. दुपारी दीड वाजताच सर्व विभागात सामसुम दिसतात तर दुपारी साडेतीन वाजता पुन्हा कामावर हे अधिकारी कर्मचारी रुजू होतात. पाच वाजेपर्यंत पालिकेत गजबज सुरु होते. सोमवारी सायंकाळी पालिका कर्मचारी, अधिकाऱयांना पथक तपासणीला येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
तरीही पालिकेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे मंगळवारी उशीरा पालिकेत आले. मग पथक दारातच थांबले होते. त्या पथकाकडून जे जे उशीरा आले. त्यांच्या हजेरीपत्रकावर सरळ अपसेंट असा शेरा मारला. त्यांच्या हजेरीपत्रकावर शेरा मारल्याने दिवसभर चर्चा सुरु होती. पथकाकडून इतर विभागाची माहिती तपासण्यात आली. या पथकात उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, लिपीक गंगातिरकर, सुर्यवंशी यांचा सहभाग होता.