प्रतिनिधी / सातारा
सातारा शहराचा यावर्षी गणेश विसर्जनाचा प्रश्न मिटला आहे. ज्या नागरिकांना बाप्पांच्या बद्दल कसलाही मनात भाव नाही त्यांच्याकडून मात्र पर्यावरणाच्या सुबक नावाच्या आडून या उत्सवाला विरोध करण्याचे अलीकडे फॅड जोरात सुरू झाले आहे. सध्या कोरोनाच्या काळात सातारा शहरात अतिशय साधेपणाने गणेशोत्सव शासनाचे सर्व नियम पाळून सुरू आहे. विसर्जन तळ्यांची पाहणी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी परफेक्ट नियोजन केले आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.दरम्यान, विसर्जन मार्गावरील खड्डे ठेकेदारांने प्रामाणिकपणे काम करून बुजवले आहेत.
गणेशोत्सव असो वा कोणताही उत्सव एक वर्ग या उत्सव, सण यांच्या विरोधात कायम असतो. पर्यावरणाच्या नावाने गळे काढून उत्सवाला विरोध करणे एवढाच हेतू असतो. तसाच काहीसा प्रकार सातारा शहरात अलीकडच्या गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला अन गणेश विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न करून तळ्याचा प्रश्न मार्गी लावला गेला. जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या व जिल्हा परिषदेच्या ताब्यातल्या प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत विसर्जन तळे उभे केले आहे. यावर्षी कोरोनामुळे अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा होत आहे. मंडळांनी अतिशय कमी उंचीच्या मूर्ती बसवल्या आहेत. काहींनी मूर्ती बसवल्या नाहीत. ज्यांनी बसवल्या आहेत त्यांना विसर्जन अगदी साधेपणाने शासनाच्या नियम पाळून करण्याचे ठरले आहे.
पालिकेने तयार केलेल्या विसर्जन तळ्याची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी केली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या बुधवार नाका, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा व गोडोलीतील कृत्रीम तळ्यांची माहिती दिली. तर नगराध्यक्षा माधवी कदम आणि उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सुचवलेल्या सुधारणा मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सांगताच बापट यांनी अभियंता अनंत प्रभुणे आणि सुधीर चव्हाण यांना सूचना केल्या. मागील वर्षी ज्या काही त्रुटी समोर आल्या होत्या त्यांची पुर्तता करण्यासंदर्भात सुचना केल्या. जेणे करुन सध्याच्या कोरोनाच्या सारख्या महाभयंकर साथीची काळजी घेऊन बाप्पांचे विसर्जन करता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
ठेकेदाराने प्रामाणिकपणे मुजवले खड्डे
पालिकेचे काम म्हणले की अनेक अडथळे निर्माण होतात. मात्र, मनात चांगला भाव ठेवून काम केले की चांगले होते. गणेशोत्सवच्या अनुषंगाने पालिकेच्या ठेकेदारांने अतिशय प्रामाणिकपणे विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवले असून त्यांचे ही पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.









