नवारस्ता / प्रतिनिधी
नवारस्ता ता पाटण येथील दोन खडी क्रशर येथे अवैध कामकाज सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार योगेश टोम्पे यांनी बुधवारी संध्याकाळी दोन्ही क्रशर सिल केली आहेत. याशिवाय त्याठिकाणचे सात पोकलॅन मशीन व ६६ स्फोटकांचे बॉक्सही ताब्यात घेतले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याने याबाबतची अधिक माहीती मिळाली नाही. दरम्यान सायंकाळी उशीरा ही कारवाई झाली असून घटनास्थळी तहसीलदार टोम्पे यांचेसह उप विभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, मंडलाधिकारी, तलाठी आदी महसूल कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिलेली माहिती अशी की या ठिकाणी अवैध खडी क्रशर सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार येथे छापा टाकून दोन्ही क्रशर सिल केली आहेत. याशिवाय त्या ठिकाणचे सात पोकलॅन मशीन ताब्यात घेतले आहेत. संबधित क्रशरची परवानगी याशिवाय तेथे असणार्या गौन खनिज त्याच्या परवानगी, रॉयल्टी भरलेबाबत पावत्या याचीयाची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान याच ठिकाणी खाणीसाठी वापरण्यात येणारी स्फोटकांची ६६ बॉक्सही सापडले असून तेही ताब्यात घेण्यात आली आहे. याचेही आवश्यक ते परवाने आदीचीही तपासणी करून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल असे अशोकराव थोरात यांनी सांगितले.









