वार्ताहर/कास
पुष्प पठार कास वर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. राज्यभरातील तसेच विदेशातील पर्यटक ही कासला भेट देत आहेत. पर्यटकांची गरज लक्षात घेऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने फिरते एटीएम सेंटर कास पठारावर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ऐनवेळच्या पैशाची गरज भागवली जाणार आहे.
कास पठारावर येणारे पर्यटक पुणे, मुंबई सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. युनोस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असल्याने परदेशातील पर्यटक ही याठिकाणी हजेरी लावत असतात. तसेच परिसरातील वजराई – एकीव धबधबा, बामणोली, सह्याद्रीनगर पवनचक्क्या प्रकल्प आदी ठिकाणी पर्यटक जात असतात. अशावेळी जास्त पैसे जवळ ठेवणे जिकरीचे ठरते. हल्ली अनेक जन ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करत असले तरी रेंज अभावी ऑनलाईन व्यवहार करणे कधी कधी शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या या सेवेमुळे पर्यटकांना रोकड सहज उपलब्ध होत आहे. शनिवार, रविवार व ईतर दिवशी ही ही फिरती व्हॅन पठारावर हजेरी लावत असते.
परदेशी पर्यटकांची भेट
कासला नेदरलँड्सच्या पर्यटकांनी भेट देऊन कास वरील निसर्गाची प्रशंसा केली. वी व्हिजीट एक्स्ट्रा ऑर्डिनरी कास प्लाटू ऑन कोल्ड, विंडी, रेनी डे. दॅट वॉज कम्पस्टेड बाय द वॉर्म. कास ईज अ ब्युटीफूल प्लेस. ऑल स्टाफ दॅट हेल्पड अस. अॅप्रिसिएट धीस अॅन्ड एक्सप्लेन द ब्यूटी ऑफ कास… अशी प्रतिक्रिया आर्थर डुरवेल यानी कास समितीच्या व्हिजीट बुक मध्ये केली.










