सातारा पालिकेत नोंदणी सुरू
प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत.ज्यांचे हातावर पोट आहे त्या हॉकर्स धारकांचे तर बेहाल सुरू आहेत. त्यांना पुन्हा व्यवसाय करण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर योजना सुरू केली.त्या योजनेमध्ये सातारा पालिका नोंदणी करत आहे.मात्र,राष्ट्रीय कृत बँकाकडून नाहक त्रास होत असल्याने पंथ विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बँका खूप त्रास देतात, अशी जळजळीत प्रतिक्रिया हॉकर्स संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या लाटेत प्रत्येक जण होरपळून निघत आहे. गरीब असेल वा श्रीमंत असेल यात कोणाची ही सुटका नाही. मात्र, जे गरीब हातावर पोट आहे त्यांचे सध्या बेहाल सुरू आहेत.त्यांच्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना आणली आहे.
या योजनेतून 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जात आहे. या योजनेची माहिती देणारे फलक सातारा पालिकेच्यावतीने शहरात लावले गेले आहेत. शहरात सुमारे 1200 हॉकर्स आहेत. त्यापैकी 400 हॉकर्सची नोंदणी झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू असतानाच लॉक डाऊन झाले. लॉकडाऊन झाल्याने अनेकांचे व्यवसाय बंद झाले तर व्यवसाय सुरू करण्यासाठी व पुन्हा आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना सुरू झाली. मात्र, सातारा शहरातील बँकाकडून आडकाठी होत आहे.
बँकाबाबत हॉकर्स संघटनेची नाराजीही योजना चांगली आहे.पण राष्ट्रीय कृत बँका खूप त्रास देतात.अनेकांची खाती नाहीत.ती खाती काढण्यासाठी 2 हजार रुपये कोठून आणणार?, नगरपालिका छान काम करते.मुख्याधिकारी अभिजित बापट, साळुंखे मॅडम, दिवेकर साहेब खूप छान सहकार्य करतात पण बँकां त्रास देत आहेत,अशी नाराजी हॉकर्स संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली.









