तरुण भारतचा कॅमेरा फिरल्यावर खळबळ
प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यात काही ग्रामपंचायतींनी निवडणूक लागली असली तरीही गाव पातळीवरील समस्या, प्रकरणे घेवून नागरिक तालुक्याच्या ठिकाणी येत असतात.परंतु तालुक्याच्या पातळीवर पंचायत समितीत आल्यानंतर कर्मचारी, अधिकारी टेबलवरुन गायब असतात. त्यामुळे हताश होवून परत फिरावे लागते.पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी स्टींग ऑपरेशन करावे, शिस्त लावावी, अशी मागणी होवू लागली आहे. तरुण भारतचा कॅमेरा फिरताच पंचायत समितीमध्ये लगेच फोनाफेनी सुरु झाली.
सातारा पंचायत समितीमध्ये सातारा तालुक्यातील 194 गावांमधील विविध कामे केली जातात. ग्रामपंचायत, पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन, शालेय पोषण आहार, स्वच्छ भारत, कृषी, लेखा परिक्षण आदी विभाग पंचायत समितीत कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात पंचायत समितीत नेमके काय सुरु आहे यावर लक्ष ठेवायला पदाधिकारीही फिरकत नव्हते. परंतु आता कोरोना कमी झाल्याने नागरिक आपली कामे घेवून पंचायत समितीत येवू लागले आहेत.
परंतु पंचायत समितीत सकाळी हजेरी लावून तासाभरात टेबलवर पाहिले असता कर्मचारी व अधिकारी दिसत नाहीत. हे कर्मचारी व अधिकारी कुठे गेले याची नोंद हालचाल रजिस्टरलही दिसत नाही. स्वतः पदाधिकाऱ्यांनाही असा अनुभव आला आहे. बेल वाजवून संबंधित अधिकाऱ्यांना बोलवणे केले असता ते अधिकारी जाग्यावर नाहीत. भागात गेले अशी उत्तरे त्यांना मिळतात. तर काही कर्मचारी चक्क बाहेर फिरताना आढळून येतात. आज सकाळी तरुण भारतने पंचायत समितीच्या विविध केबीनमध्ये काय सुरु आहे. याचे काही फोटो काढले असता फोनाफोनी सुरु झाली. काही अधिकाऱ्यांनी फोन करुन साहेब इथेच होतो, गैरसमज नसावा, अशी विनंती केली. दरम्यान, सातारा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी अचानक स्टींग ऑपरेशन करावे, अशी मागणी होवू लागली आहे.









