प्रतिनिधी / मलकापूर
मलकापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी कॉंग्रेसकडून माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण रैनाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १ वाजेपर्यंत दुसरा एकही उमेदवारी अर्ज न आल्याने स्विकृत नगरसेवकपदी नारायण रैनाक यांची निवड निश्चित झाली आहे.
मलकापूर नगरपरिषदेच्या कारभाराला अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीनंतर सत्ताधारी कॉंग्रेसकडून मनोहर शिंदे गटाचे आनंदराव सुतार व युवा नेते उदयसिंह पाटील गटाच्या सागर जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली होती. दरम्यान अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यावर स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची मागणी वाढली होती. सत्ताधारी कॉंग्रेसकडून नारायण रैनाक यांनी गुरूवारी स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ११ ते दुपारी १ पर्यंत होती. या मुदतीत फक्त रैनाक यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून रैनाक यांच्याकडे पाहिले जाते.
नगरसेवकपदाची अधिकृत घोषण १८ आक्टोंबर रोजी होणार आहे. अर्ज भरताना उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, धनंजय येडगे, मोहनराव शिंगाडे, शहाजी पाटील, अमर इंगवले, सुरेश जाधव यांची उपस्थिती होती. अर्ज भरल्यानंतर बोलताना रैनाक यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानत मलकापुरच्या विकासात योगदान देऊ अशी ग्वाही दिली.









