प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे ता.सातारा येथील युवकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मंगळवारी सकाळी एका कासवास जीवदान मिळाले. या युवकांनी कासवाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून त्याला उरमोडी नदीपात्रात सुखरूप परत सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की नागठाणेच्या ‘मोराची मळवी’नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. उरमोडी नदी परिसरात एक कासव नदीपात्र सोडून बाहेर आले होते. कासवाला पाहताच काही कुत्र्यांनी त्याला घेरले. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे तिथे असलेल्या युवकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर प्रदीप बर्गे, अक्षय साळुंखे, अभय साळुंखे, तेजस साळुंखे तसेच अजित साळुंखे मित्र परिवार अँड फ्रेंड्स ग्रुपचे युवक घटनास्थळी जमा झाले.
त्यांनी कासवाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर बोरगाव पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पुढे हे कासव या युवकांनी सुखरूपपणे उरमोडी नदी पात्रात सोडून दिले. युवकांची दाखवलेली तत्परता, संवेदनशीलतेचे नागठाणे परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.