बंद दाराआड केला जातोय धंदा, परगावच्या लोकांसाठी ‘आतून’ हाेत आहे मालाची विक्री, कोरोनाला देताहेत निमंत्रण
प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे (ता. सातारा) येथे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्याने येथील व्यापाऱ्यांनी गेल्या मंगळवारपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात केली होती. या जनता कर्फ्युला येथील व्यापाऱ्यांबरोबरच जनतेनेही उत्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र, येथीलच काही परप्रांतीय स्टील विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी या ‘जनता कर्फ्यू’ला फाट्यावरच मारले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परगावच्या ग्राहकांना ‘बंद’ दरवाज्याआड माल दिला जात आहे. या स्टील व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
नागठाणे हे महामार्गावरील बाजारपेठेचे प्रमुख गाव असल्याने येथे परिसरातील जनतेची मोठी वर्दळ असते. महामार्गालगत सेवारस्त्यानजीक तसेच सासपडे रोडला काही परप्रांतीयांची व स्थानिकांची बिल्डिंग मटेरिअल व स्टीलचे साहित्य विक्रीची मोठी दुकाने आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले असून प्रशासनाकडून ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून गावात सर्व व्यापारी, दुकानदार व ग्रामस्थांनी मिळून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेऊन दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याला गेल्या मंगळवारपासून सुरूवातही झाली.
मात्र, महामार्गावरील सेवारस्त्याजवळील असलेल्या काही परप्रांतीय स्टील विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र या जनता कर्फ्युला चक्क फाट्यावरच मारले आहे. या दुकानदारांनी बंद फाटकाआड आपल्या विक्रीचा व्यवसाय आरामात सुरू ठेवला आहे. परगावच्या ग्राहक फोन करून साहित्याची लिस्ट दुकानदाराला देतो. दुकानदार त्याच्या पट्टीतल्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवाल्याला बोलावून बंद फटकाआड गाडीत माल भरून देतो आणि हा टेंपोवाला दुकानदाराने भरून दिलेला माल बिनबोभाटपणे त्या परगावच्या ग्राहकांपर्यंत आरामात पोहोचवतो. असाच काहीसा प्रकार या जनता कर्फ्युदरम्यान येथील स्टील विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून सुरू आहे. यामुळे कोरोना साथरोगाचा प्रसार होऊ शकतो याची जाणीव या व्यापाऱ्यांना असूनही केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे व्यापारी या खेळ्या करत आहेत. त्यांनी चक्क गावच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला फाट्यावरच मारले आहे. या व्यावसायिकांवर आपत्ती व्यवस्थापन कमिटीने कडक कारवाई करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.
यापैकी एका व्यवसायिकांला याबाबत विचारणा केली असता त्याने गावातील इतर व्यवसायिकांकडे बोट दाखवले.यावेळी सदर व्यावसायिकाने ‘सासपडे रोड नजीकच्या अनेक व्यापार्यांनीही अशाच प्रकारे आपला व्यवसाय बंद दाराआड सूर ठेवला आहे. त्यांचीही दुकाने अश्याच प्रकारे सुरू असून मी केले म्हणून काय चूक केली ? अशी उत्तरे दिली.