ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज, डॉक्टरांनीही यावे पुढे
प्रतिनिधी/नागठाणे
आशियाई महामार्गावरील निमशहरी असलेल्या नागठाणे (ता.सातारा) येथे सातत्याने कोविड रुग्णांची संख्या वाढतच असून अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. रुग्णांना तातडीने कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकजण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढतच आहे. गावच्या प्रथम नागरिक असलेल्या सरपंच डॉक्टर असून त्यांनी नागठाणे गावातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सहकारी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोफत कोविड सेंटर उभारावे अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
महामार्गावरील नागठाणे हे निमशहरी व आठवडा बाजाराचे गाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गावात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आजमितीला अंदाजे ६०० च्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्ण असून आज अखेरपर्यंत अंदाजे २० रुग्णांना या आजाराने प्राणास मुकावे लागले आहे. सध्या नागठाणे येथे एक खाजगी कोविड सेंटर असून ते परिसरातील एकमेव कोविड सेंटर असल्याने सदैव भरलेलेच असते. त्यामुळे बाधितांना घरीच उपचार घ्यावे लागत असल्याने त्यांच्याकडून व कुटुंबियांकडून योग्य ती काळजी न घेतल्याने गावातील बाधितांची आकडेवारीही कमी होत नाही.
सध्याच्या ग्रामपंचायतीत युवा सदस्यांचा मोठा सहभाग आहे. तर ग्रामपंचायतीची धुरा महिला सरपंच समर्थपणे हाकत आहेत. त्यातच सरपंच या स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन जर गावाच्या हितासाठी येथील केंद्रशाळेत ऑक्सिजनयुक्त मोफत कोविड सेंटर उभारले तर गावातील बाधितांना उपचारासाठी कोठेच वणवण भटकावे लागणार नाही. त्याचप्रमाणे गावात अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. या सर्व डॉक्टरांना एकत्रित करून गावातील बाधित रुग्णाच्या मोफत सेवेसाठी निमंत्रित केले तर गावातून नक्कीच कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावाच्या भल्यासाठी तात्काळ मोफत कोविड सेंटर उभारावे अशी मागणी जोर धरत आहे.
वर्णेकरांनी केले….नागठाणेकारांनाही जमेलच…
सातारा तालुक्यातील वर्णे गावात बाधितसंख्या वाढल्याने तेथील सर्व स्तरातील नागरिकांनी तातडीने एकत्र येत गावासाठी तात्काळ ऑक्सिजन बेडसह विलगिकरण कक्ष शाळेत स्थापन केला. गावातील सर्व मंडळे, दानशूर व्यक्ती, राजकीय पुढारी सर्व हेवेदावे विसरून यासाठी एकत्र आले.गावात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनाही मोफत सेवेसाठी प्रोत्साहित केले.त्यामुळे रुग्णांना गावातच योग्य उपचार मिळू लागल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले.वर्णे सारख्या गावाला जर हे जमू शकते तर नागठाणेसारख्या गावाला गावातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मोफत कोविड सेंटर उभारणे नक्कीच शक्य होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









