सातारा / प्रतिनिधी :
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजाराची कवाडे उघडली गेली आहेत. शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य दिले आहे. आता सरकारने शेतमाल व्यापार नियंत्रण कमी करुन मार्केट यार्ड ही बाजार पेठ न ठेवता देशात कुठेही आपला शेती माल विकता येणार आहे, असे प्रतिपादन शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य प्रमुख संजय कोल्हे यांनी केले.
शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी संगीता शिंदे, कोरेगाव तालुकाध्यक्षपदी संजय गायकवाड, महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी आकाश ढेंबे, खटाव तालुकाध्यक्षपदी सुनील पांडेकर, वाई तालुकाध्यक्षपदी अजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभाकर शेवते, मनोहर सणस, शशि कदम, अशोक चव्हाण, प्रमोद कदम, एकनाथ जाधव, शंकर कापसे त्यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, करार शेतीला घाबरुन न जाता त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, बाजार समित्या व हमीभाव राहणारच आहे. बाजारात स्पर्धा होवून तसेच मध्यस्तांची साखळी कमी होवून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरवाढीचा फटका बसणार नाही.
बाळासाहेब चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांसाठी नव्याने आलेल्या कायद्यात चांगल्या तरतूदी आहेत. त्या कायद्याचे फायदे गावोगावी जावून समजून सांगणार आहोत. आम्ही शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्ष या कायद्याची मागणी करत होतो. जर परदेशी थेट गुंतवणूकीने शेतकरी ग्राहक यांना लाभ होणार आहे तर हा विरोध चुकीचा आहे.









