प्रतिनिधी / सातारा :
निवडणूक प्रक्रियेत त्रुटी व अनियमितता आहे हे मान्य करुन सातारा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाचा पंचवार्षिक निवडणूकीचा जाहीर केलेला कार्यक्रमच (2021 ते 2026) रद्द करण्यात आला आहे. आता नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व वाचनालयाचे आजीव सभासद विजय मांडके यांच्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मतदार यादीमधील त्रुटी, सदोष मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम, छाननी नंतर अर्ज मागे घेण्याची मुदत, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी हे सगळे सभासद मतदानांवर अन्याय करणारे व मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याच्या हरकतीचा अर्ज संस्थेचे विजय मांडके यांनी दाखल केला होता. त्यानंतर अर्ज छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित राहून त्यांनी नगरवाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्याची लेखी शिफारस केली. त्यामुळे श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाची पंचवार्षिक निवडणुकच रद्द करण्यात आली असल्याची माहिती विजय मांडके यांनी दिली आहे.
त्यामुळे आता त्रुटी दूर करुन नव्याने कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एकदाही श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात उपस्थित न राहता त्यांनी निवडणूकच रद्द केली हे विशेष म्हणावं लागेल, अशीही प्रतिक्रिया मांडके यांनी सोशल मिडियावर व्यक्त केली आहे.