प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात पालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आले. हे अभियान राबवत असताना सत्ताधाऱ्यांनी सर्वांना विश्वासात न घेता राबवले गेले. त्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डात हे अभियान राबवण्यात आले याबाबतही उलटसुलट प्रतिक्रिया उमट असून, सातारा पालिकेचे हे अभियान केवळ ट्विटरवरच सुरु होते. सत्तारुढ आघाडीचे काहीच काम दिसत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियानाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये कराड राज्यात दुसरे आले आहे. तर सातारा पालिका कुठे आहे याबाबत नगरविकास आघाडीचे अशोक मोने यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अभियान राबवायला पदाधिकारी जागेवर पाहिजेत. नगराध्यक्षांना काम करावे लागते. नगरसेवकांना बोलवावे लागते. सत्तारुढ आघाडीचे कुठेच काही काम दिसत नाही. त्याला नगराध्यक्ष सक्षम लागतात. उपाध्यक्ष लागतो. पार्टीचे नेते लागतात. या अभियानात कसा आपला नंबर यायचा. काहीच केले नाही यांनी. सातारा शहरात कोरोनाची एवढी वाढ होतेय. स्वच्छता करणे, सॅनिटाईज करणे हे नाहीच, वारंवार सांगून सुद्धा प्रयत्न होत नाही.
सत्तारुढ आघाडीने चांगले काम केले तर आम्ही त्यांना सहकार्य करतोच. चांगल्या कामाला आमचे सहकार्य कायम राहणारच, अशी रोखठोक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सत्तारुढ आघाडीच्या पदाधिकाऱयांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांना नंबर कितवा आला, निकाल लागला की नाही याचीच माहिती नव्हती. दरम्यान, सातारा पालिकेच्या आरोग्य विभागामधून हे अभियान ज्या पद्धतीने राबवायला हवे तसे राबवण्यात आले नाही. केवळ सातारा पालिकेच्या ट्विटर अकाऊंटवरुन या अभियानाचा जास्तीजास्त गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात प्रत्येक वॉर्डात वसुंधरा अभियानाचे प्रबोधनात्मक कार्य मात्र दिसत नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.









