प्रतिनिधी / नागठाणे
देशमुखनगर (ता.सातारा) येथे सुरु असलेल्या चोरट्या दारुविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा टाकून सुमारे १० हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.याप्रकरणी पोलिसांनी शकीला गुलाब मुलाणी ( वय.६२,रा. देशमुखनगर, ता. सातारा ) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
देशमुखनगर येथे शकीला मुलाणी ही अवैधरित्या दारूविक्री करत असल्याची माहिती सपोनि सागर वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे,विजय साळुंखे, विशाल जाधव,उत्तम गायकवाड व महिला पोलीस तेजस्विनी जाधव यांना घेऊन दुपारी छापा टाकला. यावेळी राहते घरात बाथरूमच्या वर पोलिसांना देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी देशी दारूच्या १० हजार रुपये किंमतीचा सुमारे १९२ बाटल्या यावेळी जप्त केल्या. घटनेचा पुढील तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.









