प्रतिनिधी / नागठाणे
गांधीनगर (काशीळ) ता.सातारा येथून दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्यास बोरगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. नुरअहमद चांदसाहेब मुल्ला (वय.२८,रा.गांधीनगर, विजापूर,कर्नाटक) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरून नेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फाळकेवाडी(जि. सांगली) येथील भालचंद्र राजाराम चंद यांची हिरो डीलक्स दुचाकी मेहुणा सचिन दत्तात्रय मोरे यांच्याकडे होती. सात महिन्यांपूर्वी ही दुचाकी गांधीनगर (काशीळ) येथून चोरीस गेली होती. याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या घटनेचा तपास करत असताना संशयित चोरीच्या दुचाकीसह सातारा येथे येणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली.यावेळी पोलिसांनी सापळा रचून संशयित नुरअहमद चांदसाहेब मुल्ला याला दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार नितीन (बाबा) महाडिक,विशाल जाधव,विजय साळुंखे,उत्तम गायकवाड,चालक धनंजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.









