पाटबंधारे अभियंत्याने केली पाहणी
शेतकऱ्याच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटना
प्रतिनिधी / सातारा
धोम कॅनॉल लगत पाटबंधारे विभागाच्या जागेतच दिव्यांग शेतकऱ्याच्या शेताला लागूनच एका कारखान्यातील वेस्ट मटेरियल टाकले होते. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भिती त्या शेतकऱयाने व्यक्त केली होती. तरुण भारतने वृत्त प्रसिद्द करताच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याने जाग्यावर जावून पाहणी केली. संबंधितास ते केमिकल मिश्रीत मळी दोन दिवसात उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पोलीस अधीक्षक व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे तक्रार करावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
धोम धरणाचा कालवा क्रमांक 7 जवळ अज्ञाताने अर्थव फौंड्री येथील रॉ मटेरियल टाकले आहे. हे रॉ मटेरियल पाटबंधारेच्या जागेत टाकल्याने कॅनॉलला पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात विषारी बनून जाण्याची भिती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जागरुक शेतकरी राजेंद्र कदम यांनी ही बाब लगेच संबंधितांच्या निदर्शनास आणून देत पाटबंधारे विभागास कळवले. ‘तरुण भारत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. रॉ मटेरियल जेसीबीच्या सहाय्याने तेथेच पसरले असून बातमी प्रसिध्द करताच पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी तेथे जावून केली. अर्थव फौंडीच्या व्यवस्थापकास फोन करुन दोन दिवसात ते मटेरियल उचला अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी ताकिद दिली गेली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान त्या रॉ मटेरियलने झाल्यास कोण जबाबदार?, ज्या कोणी तेथे रॉ मटेरियल टाकले आहे त्यावर आणि त्या कंपनीवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे रितसर दाद मागावी लागेल. प्रसंगी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.









