रात्री होतोय चोरटा वाळू उपसा, महसुलचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / नागठाणे
नूने (ता.पाटण) गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या तारळी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.रात्रीच्या अंधारात येथून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे.मात्र येथे सुरू असलेल्या या अवैध वाळू उपश्याची साधी माहिती गावच्या तलाठी व भागाच्या सर्कलला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याला महसूलचा वरदहस्त आहे का ? अशी चर्चा सुरू असून नूने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
नागठाणे ते तारळे रस्त्यापासून सुमारे १ किमी आत पाटण तालुक्यातील नूने गाव आहे.या गावाजवळुनच तारळी नदी जाते.नदीवर तारळे गावापासून काही अंतरावरच बंधारा बांधण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून भागातील काही वाळूमाफियांनी या बंधाऱ्यापासून खाली चोरून वाळू काढण्याचा उद्योग सुरू केला आहे.
हे वाळूमाफीये रात्रीच्या अंधारात तारळे ते राहुडे-पाली रस्त्याने येऊन नूने गावच्या हद्दीत नदिपात्रात उतरून वाळू उपसा करत आहेत.त्यासाठी चक्क जेसीबी,पोकलेनचा वापर या वाळूमाफियांकडून केला जात आहे.काढलेल्या वाळूचे नदीपात्रातच ढीग मारून तो लगेच डंपरच्या साहाय्याने रात्रीच इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहे. येथून दररोज रात्री २ ते ३ डंपर वाळू काढली जात असल्याचे समजते. वाळूने भरलेले डंपर नूने गावच्या हद्दीतून बाहेर पडत असल्याने गावचा नुकताच बनविन्यात आलेल्या रस्ता खराब होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.त्यामुळे नूने गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून लवकरात लवकर हा अवैध वाळू उपसा बंद करून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.









