वार्ताहर / कास
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळ्या पलीकडे असणाऱ्या गावांना जिल्हा परिषदेच्या तराफा व लाँच सेवेने जोडले असून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्याचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे,कोयना जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गावांच्या रस्त्याची मोठी हानी झाली असून रस्ता पूर्ववत होणेसाठी विलंब लागणार आहे. त्याकरिता जलाशयात असणारी तराफा व लाँच सेवा त्वरित सुरू करावी व सध्याची परिस्थिती पाहून तिकीट दरात पन्नास टक्के सूट मिळावी. अशी प्रमुख मागणी आरव व कांदाटी भागात आमदार मकरंद पाटील यांचे दौऱ्याचे वेळी तसेच बाळासाहेब भिलारे यांचेकडे करणेत आली होती.
त्याचा मागोवा घेत ६ ऑगस्टला झालेल्या नियोजन मंडळाचे सभेमध्ये चर्चा घेऊन पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांना या विभागातील परिस्थिती ची माहिती दिली व ५० टक्के सूट तात्काळ लागू करावी अशी चर्चा केली त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने पत्र देऊन लाँच व तराफा सेवा दरात ५० टक्के सूट देणे बाबतीत निर्णय झाल्याचे कळविले आहे,या मुळे कांदाटी,कोयना,सोळशी विभागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार मकरंद पाटील,श्री बाळासाहेब भिलारे,सभापती संजुबाबा गायकवाड, जिल्हा बँक संचालक राजेंद्रशेठ राजपुरे व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.









