प्रतिनिधी / नागठाणे
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार रुपये उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यासह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पिरेवाडी(भैरवगड) ता. सातारा येथील फिर्यादी ओंकार शामराव शिंदे युवकाविरुद्ध आठ दिवस उलटल्यानंतर वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा शहाणपणा सुचला आहे.पहिल्या दिवसापासून तडजोड, प्रसारमाध्यममध्ये बातम्या येऊ नये,यासाठी धडपडणाऱ्या वनविभागाने ओंकार शिंदे यांच्या वर गुन्हा दाखल करून आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकारीच सरसावले आहेत. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.असा गुन्हा दाखल झाला तर वनविभागाच्या विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचे पिरेवाडी ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वतःच्या मालकीच्या शिवारातील पिकांचे माकडांपासून नुकसान होऊ नये, म्हणून पिरेवाडी येथील युवक ओंकार शिंदे गेला असता त्याला वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले व अज्ञात दोघांनी पकडले होते.यावेळी त्यांनी त्याला अनेक ठिकाणी फिरवून मारहाण करत त्याच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.त्याच्या कुटुंबियांकडून २५ हजार रुपये त्या वन कर्मचाऱ्यांनी घेतले असल्याचे समोर आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि बोरगाव पोलिसांकडे तपासाअंती सपोनि डॉ.सागर वाघ यांनी वनपाल योगेश गावित,वनसंरक्षक महेश सोनवले व अज्ञात दोघांविरोधात शनिवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
वनविभागात आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत असल्याचे समजल्यावर अनेकांनी युवकाने पोलिसात तक्रार देऊ नये व वनविभागातील तक्रार अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. यामध्ये वनविभागातील काही अधिकाऱ्यांसह पिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाचाही सहभाग असल्याचे समजते.मात्र ओंकार शिंदे याने शनिवारी रात्री पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने गावीत, सोनवले हे संशयित तेव्हापासून नोकरीच्या ठिकाणी सुद्धा रजा न काढता मोबाईल स्वीच आँफ करून बेपत्ता आहेत.
मंगळवारी वनविभागाकडून ओंकार शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा हालचाली सुरू झाल्या असल्याची कुणकुण पिरेवाडी ग्रामस्थांना लागली आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ओंकार शिंदे विरुद्ध कोणता गुन्हा दाखल करणार याची माहिती देता येत नसल्याचे सांगितले. एवढ्या उशिरा गुन्हा दाखल करण्यामागचे कारणही सांगण्यास नकार दिला.
घटना घडून आठ दिवस उलटून गेल्यावर वनविभाग अचानक ऍक्टिव्ह कसा झाला? इतरवेळी केलेल्या कारवाईंची माहिती लगेच प्रेसनोट देऊन माध्यमांपर्यंत पोहचविण्याची धडपड करणारे वनविभागाचे अधिकारी आठ दिवस नेमके काय करत होते?वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तडजोडीसाठी पळणारे अधिकारी व शिक्षक नेमके कोण? ओंकार शिंदे याने तडजोड केली नाही म्हणूनच खंडणीच्या गुन्ह्यात अटकलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी वनविभाग आता त्याच्याविरुद्ध सूडबुद्धीने गुन्हा दाखल करत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले आहेत.









