प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील सर्वच ठिकाणी बुधवारी मान्सूनला सुरुवात झाली. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी चांगल्या सरी कोसळल्या. मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये कमालीचा बदल जाणवत होता. हवामान्याच्या अंदाजानुसार बुधवारी अगदी सकाळपासुनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाऊस बुधवारी सकाळी सुरु झाला. पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत होत्या.
सध्या बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेसह काही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने शहराच्या मुख्य मार्गांवर नागरिकांची खरेदीकरीता गर्दी झाली होती. त्यातच पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसाची सुरूवात होताच रस्त्यावर दिसणारी गर्दी बऱयापैकी कमी झाली होती. मुख्य म्हणजे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांची पाऊस येता क्षणी चांगलीच धावपळ झाली. काही विक्रेत्यांनी आपला मालाची त्वरित उचल करून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेताना दिसत होते.
शेतकरी वर्ग या पावसाच्या आगमानाने चांगलाच आनंदी झाला आहे. जिल्हय़ात ठिकठिकाणी खरीपाच्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागद, ताडपत्री खरेदी होवू लागली आहे.









