सातारा, प्रतिनिधी
नोव्हेंबरच्या आरंभी कोरोना बाधित वाढण्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. कोरोनामुक्तीने चांगला वेग घेतला असून गंभीर स्थिती दूर झाल्याने जिल्हयात आजमितीस 4,285 एवढे बेड रिक्त आहेत. तर प्रत्यक्ष उपचारार्थ फक्त 883 व विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 403 असे एकूण 1,286 रुग्ण प्रत्यक्ष उपचारार्थ आहेत. तर 1243 लक्षणे नसलेले बाधित नागरिक होम आयसोलेट असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी 210 नागरिक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात 7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 145 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
‘थोडा गम, थोडी खुशी’
पुढील आठवडय़ात येणाऱया दीपावली सणाची धामधूम जिल्हय़ात सुरु झाली असून खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होवू लागलीय. यावर्षीच्या दीपावली कोरोना व मंदीचे सावट आहेच. त्यातच बाधित वाढीचा मंदावलेला वेग दिलासा देत असतानाच परदेशातून येणाऱया दुसऱया लाटेचा बातम्या अन जिल्हय़ात कमी संख्येने पण सुरु असलेली बाधित वाढ अशा ‘थोडा गम, थोडी खुशी’ अशा वातावरणात नोव्हेंबरचा पहिला आठवडा नागरिक अनुभवत आहेत. सायंकाळनंतर थंडीचा कडाका जाणवू लागला असून मास्क, स्वच्छता व सामाजिक अंतर राखत नागरिक काळजी घेत आहेत.
सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यात वाढ
कोरोनाचा वेग नोव्हेंबरच्या आरंभापासून मंदावला असला तरी 150 ते 200 च्या पटीत बाधित वाढ सुरुच आहे. यामध्ये सातारा, कोरेगाव, खटाव, जावली तालुक्यातील वाढ चिंता वाढवतेय. गुरुवारी रात्रीच्या अहवालात एकटय़ा कोरेगावात 28 नवीन बाधित समोर आले असून तालुक्यात एकूण 38 बाधित समोर आलेत. सातारा हॉटस्पॉट ठरला असून 50 च्या पटीत रुग्ण वाढ सुरु आहे. कराडात वेग मंदावला असला तरी तिथे 16 नवीन बाधित समोर आलेत. महाबळेश्वर तालुक्यात फक्त 1 नवीन बाधित आढळून आला आहे.
जिल्हय़ात 7 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे धोडोशी ता. सातारा 66 वर्षीय पुरुष, रोहट, ता. सातारा 83 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव 67 वर्षीय पुरुष, मुळीकवाडी, ता. फलटण 65 वर्षीय पुरुष, उंब्रज, ता. कराड 75 वर्षीय महिला व उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथे पिरवाडी, ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, दिघंची, ता. आटपाडी जि. सांगली 88 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 बाधितांचा मृत्यु झाला आहे.
259 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा 7, कराड 14, फलटण 5, कोरेगाव 40, वाई 14, खंडाळा 21, रायगाव 52, पानमळेवाडी 8, महाबळेश्वर 10, दहिवडी 27, तळमावले 14, म्हसवड 4, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 43 असे एकूण 259 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 203228
एकूण बाधित 47,754
एकूण कोरोनामुक्त 43,488
मृत्यू 1,592
उपचारार्थ रुग्ण 2,674
शुक्रवारी
एकूण बाधित 145
एकूण मुक्त 210
एकूण बळी 07