● साताऱ्यासह जिल्हाभरात व्यापारी रस्त्यावर ● चूक केंद्राची असो की राज्याची, खळगी भरु दे पोटाची
“तरुण भारत” प्रतिनिधी / सातारा :
अवैज्ञानिक कारणे पुढे करुन अन्यायाविरोधात सामान्य जनतेसह व्यापारी तुटून पडला आहे. इंग्रजी राजवटीत प्रतिसरकार उभारणाऱ्या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात आता एल्गार सुरु झाला आहे. त्याची सुरुवात मंगळवारी साताऱ्यात सविनय कायदेभंगाने झाली. हजारो नागरिक रस्त्यावर खुलेआम आले तर व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करत मानवी साखळी उभी केली. शहरात चार ते पाच ठिकाणी उत्स्फूर्त रॅली काढल्या गेल्या. व्यायामशाळा असोसिएशनने पोवईनाक्यावर केलेल्या एल्गाराने अनेकांचे लक्ष वेधले. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर मंगळवारच्या ठिणगीचा वणवा होईल. दरम्यान, ‘चूक केंद्राची असो की राज्याची खळगी भरु दे’ पोटाची यावर सामान्य जनता स्थिर झाली आहे.
कोरोना संसर्ग गेल्या मार्चपासून जिल्हय़ात सुरु झाला. तेव्हापासून प्रशासनाने साथ रोग नियंत्रण कायदा लागून जे जे नियम पाळण्यास सांगितले ते सातारा जिल्हावासियांनी पाळलेले आहेत. लॉकडाऊनमुळे पहिल्या तीन महिन्यातच हातावर पोट असलेला सामान्य माणूस मेटाकुटीला आला. मात्र, त्याला मोफत रेशन देवून शासनाने तगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर कोरोना साथ नियंत्रणात आल्यावर जगरहाटी सुरु झाली. तेव्हा देखील प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून व्यापारी, दुकानदारा, नागरिक व सर्वजण वाटचाल करत असताना दुसरी लाट ऐन उन्हाळय़ात थडकली आणि पुन्हा पहिल्यांदा पाढे त्याच पध्दतीने प्रशासनाचे काम सुरु झाले.
नियम लादून संकट टळत नाही
कोरोना आला, राहिला आणि आताही तो सोबत आहे. या कालावधीत अनेकविध अनुभव प्रशासनानेही घेतले आणि जनतेनेही घेतलेले आहेत. अनेकांची कुटुंबे कोरोनाने खाल्ली आहेत तर अनेक कुटुंबातील कर्ती माणसं गमावली आहेत. मात्र, जीवन सुरुच राहणार असल्याने जगरहाटी थांबत नाही. त्यातच दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत सातारा जिल्हा लोटला गेला. बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी देखील नियम पाळण्यास सहकार्यच केले.
पण यामध्ये जिल्ह्यात प्रशासनाचा कोरोना अपलोड घोटाळा समोर आल्यावर वाढत्या आकडेवारीचे रहस्य समोर आले. त्यातून मार्ग काढून जनतेला दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी आकडेवारीचे भूत उभे करुन पुन्हा लॉकडाऊनचे हत्यार उपसले गेल्याने सातारकर पॅनिक झालेले आहेत. त्यावर फुंकर घालून मध्यम मार्ग काढून जगरहाटी सुरु ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रत्येक वेळी लॉकडाऊनचा उपाय समाजमनावर विपरित परिणाम करत आहे. मात्र, हम करे सो कायदा म्हणत ज्या पध्दतीने निवडणुकीला परवानगी पण दुकान उघडण्यास परवानगी नाही असा प्रकार सुरु होता. त्याबाबत तरुण भारत ने सडेतोडपणे लोकभावना मांडत पुढाकार घेवून वस्तुस्थिती मांडल्यानंतर आता लोकभावना बोलू लागल्या आहेत.
मर्यादेनंतर सुरु झालाय कायदेभंगमाजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात, दोन मंत्री असलेल्या जिल्हय़ात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कोरोनाची साथ आटोक्यात येत नाही. मात्र, यावर कोणीही बोलायला तयार नव्हते. लोकभावना जागृत होत असल्याने काहीजण बोलू लागलेत. मात्र तोपर्यंत आता नागरिकांच्या भावना तीव्र झालेल्या असून ते सविनय कायदेभंग करण्यापर्यंत येवून पोहोचल्या आहेत. यातूनच साताऱयासह अनेक ठिकाणी व्यापारी, नागरिक रस्त्यावर आले होते.
नियम तर पाळतच आहोत
जगरहाटी सुरु झाली की गर्दीही होणारच आहे. कोरोनाच्या तडाख्यात तसे कोणालाही सापडायचे नसते. कोणी स्वतः ‘आ बैल मुझे मार’ असे म्हणत संकटाला निमंत्रण देत नाही. तरीही ज्या पध्दतीने लॉकडाऊनबाबत काही निर्णय प्रशासनाने घेतलेले आहेत. त्याबाबतचा आक्रोश आता व्यक्त होवू लागला आहे. लोकभावनेचा आक्रोश ‘तरुण भारत’ ने सामाजिक पटलावर आणला. सातारा जिल्हावासियांच्यावर अन्याय होत असेल तर ‘तरुण भारत’ ने नेहमीच सामजिक बांधिलकीतून जनतेचा आवाज बुलंद केलेला आहे. त्यामुळेच असंख्य जिल्हावासियांनी ‘तरुण भारत’ वर अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेक जांगडगुत्ते आहेत ते सोडून सर्वांनी एकमेकांना बरोबर घेवून एकमेकांचे जगणे सुसहय़ करत या संकटावर मात करण्यासाठी एक रहावे हीच भावना आहे.
न्याय द्या, अन्यथा आंदोलन जिल्हय़ात विदारक स्थिती निर्माण होवू पहात आहेत
आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागलेय. हा सामाजिक परिणाम भयंकर आहे. जगण्याचे मार्ग खुंटल्यावर पोटाला तिडका देत बसण्यापेक्षा आम्हाला कोरोनाने मरु द्या, या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत वेदनादायकी आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करुन त्यांच्या फाटक्या खिशाला कशाला कात्री लावता याचे उत्तर शोधावे लागणार आहे. कोटय़वधी रुपयांचा दंड या काळात गोळा झाला. मात्र, कोरोना हटायला तयार नाही. तो दंडाने, गुन्हे दाखल करण्याने हटणार नाही. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या लढाईत लढताना माणसेही जगली पाहिजेत. त्यांच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणून संकटावर मात करता येणार नाही. त्यामुळेच पारदर्शकता आणा, उपाय योजना करा, निर्णयात लोकसहभाग घ्या आणि या लढाईत विश्वासाने सर्वांना सहभागी करुन घ्या, अन्यथा सविनय कायदेभंगाचा वणवा पेटू शकतो.
लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना टिकवा
सातारा जिल्हय़ात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आणि इतर सर्व प्रकारची दुकाने बंद. कृषीसेवा केंद्रे सुरु, हॉटेल पार्सल व्यवसाय सुरु त्यांना ठराविक वेळ. मग गर्दी होते. गर्दी टाळण्यासाठी वेळा वाढवण्याचा पर्यायही तपासून पहावयास हवा. त्यासाठी सहकार्य करण्यास जिल्हावासिय तयार आहेत. मात्र, लॉकडाऊनचा करा मग जगा कसे ? या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱयांना टिकवा अशी मागणी व्यापाऱयांसह नागरिकांनी केलेली आहे. आता प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेवून सगळय़ांचे जगणे सुसहय़ करण्याचे प्रयत्न करावेत.









