प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने चालू आहे. उपलब्ध होणारी लस समन्याय पद्धतीने वाटप केली जात आहे. प्रभावीपणे लसीकरण होत आहे. 3 जुलै रोजी एका दिवसात 262 लसीकरण सत्रामधून तब्बल 42,318 एवढया विक्रमी संख्येने नागरिकांचे लसीकरण केले, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
आरोग्य कर्मचारी 92, आघाडीचे कर्मचारी 264, 18 ते 44 वयोगटातील 20 हजार 697, 45 ते 60 वयोगटातील 12261, साठ वर्षाच्या पुढील 9004 नागरिक अशा एकूण 42 हजार 318 एवढया विक्रमी संख्येने नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळेल, अशा रीतीने लस वाटप केले जात आहे. आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी त्याचे काटेकोर नियोजन करीत आहेत.
लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावर देखील विविध पातळय़ांवर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत असून, ज्या ठिकाणी कमी प्रतिसाद आहे, तेथे घरोघरी प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत. नागरिकांनी असाच प्रतिसाद लसीकरणाला द्यावा. तसेच; सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब करावा, असे आवाहन देखील गौडा यांनी केले आहे.