प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
लसीकरण केंद्रावर नागरिकांना टोकन दिल्या नंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जो नागरिक कोरोना बाधित झाला आहे त्याच्या संपर्कात जे-जे आले आहेत त्या सर्वांचा शोध घ्यावा.
तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी. त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारती ताब्यात घ्यावत, अशा सूचना गृह राज्य मंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.