गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुचना
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता दि.24 मे च्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी काढले आहेत. सातारा शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दोन दिवसापुर्वीच सांगून कडक लॉकडाऊन केला आहे. दि.24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपुर्ण सातारा जिल्हयातील लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.सातारा जिल्ह्यात सरासरी प्रतिरोज 1800 ते 1900 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत.पाटण तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आहे.तरीही आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी काढले आहेत.त्याची महसूल आणि पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करावी. जेणेकरुन पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आणखीन कमी होण्यास मदत होईल.