बाधितांचाही वेग मंदावला, रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये 18 जण बाधित
प्रतिनिधी/सातारा
मे महिन्यात एकाच दिवसात 77 बाधित, एकाच दिवसात 80 बाधित असे करता करता आजमितीची 649 अशी कोरोना बाधितांची संख्या अंगावर काटा आणत आहे. बाधित वाढत होते व कोरोनामुक्तांची संख्या त्या मानाने कमी होती. मात्र गेल्या आठवडय़ापासून कोरोनामुक्तांचा वेग वाढला असल्याने जिल्हा कोरोनाच्या भीतीतूनही मुक्त होऊ पाहात आहे. जो कराड तालुका कोरोना बाधितांच्या संख्येत पश्चिम महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरला होता व आजमितीस दोनशेच्या उंबरठय़ावर उभा असताना कराड तालुक्यात आज कोरोनामुक्त झालेल्या 18 जणांसह एकुण 162 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कराड तालुक्याची कोरोनामुक्तीकडे सुरु झालेली वाटचाल जिल्हय़ासह राज्याला प्रेरणादायी ठरणार आहे.
दरम्यान, जिल्हय़ात मोठय़ा संख्येने कोरोना बाधित होण्याचा वेग मंदावला असला तरी दिवसभरात दहा बाधित आढळून आले तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्यात 18 जणांची भर पडल्याने दिवसभरात एकूण 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही बाब देखील अचानक धक्का देणारी आहे. त्यामुळे आजमितीस जिल्हय़ाची बाधितांची एकुण संख्या 649 असली तरी त्यातील एकुण 364 जण कोरोनामुक्त झाले असून हे बरे होण्याचे 50 टक्के प्रमाण दिलासादायक आहे.
कोरोना प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून गेल्या दहा आठवडय़ांपासून जिल्हय़ातील वातावरणाचा लेखाजोखा 7 रोजीच्या ‘तरुण भारत’च्या अंकात घेण्यात आला होता. यामध्ये ‘तरुण भारत’ने तर ‘सातारा जिल्हा नक्कीच कोरोनामुक्त होईल’, असा आशावाद जागवला होता. तसेच काळजी घेण्याबाबत ही यामध्ये आरोग्य यंत्रणेसह गंभीरता जाणून दिली होती. पोलीस व या लढाईतील प्रत्येकाच्या योगदानाचा गौरव करत असताना आता कोरोना केअर सेंटरमधून कोरोनामुक्त होणारे रुग्ण हे खूप मोठे यश असल्याचा उहापोह केला होता. तोपर्यंतच सोमवारी जिल्हय़ात 10 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढत असतानाच दुपारपासून कोरोनामुक्तीचे वारे वाहू लागले. जिल्हय़ात एकाच दिवशी आरोग्य विभागाचा डंका वाजला आणि एकाच दिवसात 47 जण कोरोनामुक्त होऊन खडखडीत बरे झाले व त्यांना तेवढय़ाच आनंदकल्लोळात निरोपही देण्यात आला आहे. मात्र एका दिवसात 28 जणांचा आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्ट अजून काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे असे सांगत आहे.
28 नागरिकांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
सातारा जिल्हय़ातील दहा जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत. यातील दोघांचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
दोघांचा मृत्यू, 8 जण बाधित
बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता. खटाव तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व विसापूर येथील 71 व 62 वर्षीय पुरुष जावली तालुक्यातील काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26 पुरुष व 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
364 नागरिक कोरानातून पूर्णपणे बरे
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 18 व सह्याद्री हॉस्पीटल, कराड, येथील 10, कोरोना केअर सेंटर, खावली येथील 6 नागरिक, बेल एअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 5 व मायणी मेडिकल कॉलेज येथील 8 असे एकूण 47 आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत 364 नागरिक कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कराड तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
सोमवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील 36, 28, 34, 24 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 7 व 13 वर्षांच्या मुली, 60 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 12, 14 व 15 वर्षीय मुले, वानरवाडी येथील 40, 29 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय युवक, 66 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष आणि दोन पुरुष, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बहुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला, साकुर्डी येथील 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश असून कोरोनामुक्त झालेल्या या 18 जणांसह कराड तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु लागला आहे. आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 राहिली आहे.
पाटण, साताऱयासह खटावमधील रुग्ण कोरोनामुक्त
पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील 16 वर्षीय युवक, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला, सदुवरपेवाडी येथील 4 वर्षाची मुलगी, गलमेवाडी येथील 12 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील केळघर 16 वर्षीय युवक वाई तालुक्यातील आसवली 40 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील खडगाव येथील 22 व 28 वर्षीय महिला, शाहूपुरी येथील 29 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, धनावडेवाडी येथील 22 वर्षीय महिला, चिंचणेर लिंब येथील 52 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील शेळकेवाडी येथील 38 वर्षीय महिला, अंभेरी 22, 21, 32 वर्षीय पुरुष व 45 व 55 वर्षीय महिला, कलेढोण येथील 42 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला. महाबळेश्वर तालुक्यातील देवळी येथील 28 वर्षीय महिला व 15 वर्षाचा मुलगा, पाचगणी येथील 53 वर्षीय पुरुष व 3 वर्ष 6 महिन्याचे बालक. खंडाळा तालुक्यातील अडीच वर्षीय बालक कोरोनामुक्त झाले आहे.
181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
आज दिवसभरात कोरोनामुक्तीचा डंका वाजत असतानाच बाधितांच्या सहवासात आलेल्या तसेच काही लक्षण असलेल्या रुग्णांचे रिपोर्ट तपासणीस पाठवले होते. एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे दिलासादायक असून यापुढे जिल्हावासियांनी अशाच प्रकारे काळजी घेतल्यास जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो, हा आशावाद नागरिकांच्या मनात रुजू लागला आहे.
252 जणांच्या घशातील नमुने पाठविले तपासणीला
दरम्यान, सोमवारी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, शिरवळ येथील 20, कराड येथील 53, फलटण येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 37, वाई येथील 73, रायगाव येथील 7, मायणी येथील 1, बेल एअर, पाचगणी येथील 10 असे एकूण 252 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्हय़ात सोमवारपर्यंत
बाधित 649
मुक्त 364
बळी 28
सोमवारी
बाधित 2
मुक्त 47
बळी 02