● दिवसभरात 29 जणांची मात
● एक बाधिताचा मृत्यू
● 42 जण निगेटिव्ह
● 145 जणांचे अहवाल तपासणीला
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ात सुरु असलेला कोरोनाचा कहर आता कमी होत आहे. मे महिन्यात ज्या झपाटय़ाने बाधितांचा आकडा वाढला त्याच वेगाने जून महिन्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आहे. मंगळवारी 29 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे मुक्तीची टक्केवारी थेट 75 च्या पुढे गेली आहे. एकूण बाधित 745 असले तरी सध्या केवळ 148 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्हय़ातील काही तालुक्यात रुग्णसंख्या एकेरी आली आहे. मंगळवारी वेळे, ता. वाई येथील 50 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला श्वसनाचाही त्रास होता. दरम्यान, पुण्याहून येणारा अहवाल उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता.
कोरोनाची महामारी जगभरासह मुंबई, पुण्यात वाढत असली तरी महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हय़ात कोरोनाचा आलेख खाली आल्याचे जाणवत आहे. सातारा जिल्हय़ातही तीच परिस्थिती आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बाधितांचा आकडा 500 ओलांडत होता. तेव्हा उपचार घेणाऱयांचा आकडा 350 वर होता. दीड महिन्यात हे प्रमाण अनेक अंगाने बदलते आहे. कोरोनामुक्तीचा वेग झपाटय़ाने वाढत असल्यामुळे लोकांची मानसिक स्थितीही सुधारत असल्याचे मानसोपचार तज्ञांचे निरीक्षण आहे.
जिल्हय़ातील 29 जण कोरोना मुक्तांना दिला निरोप
खटाव
खटावचा 57 वर्षीय पुरुष, चिंचणी येथील 3 पुरुष व 2 महिला.
सातारा
खडगुण येथील 64 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 41 वर्षीय पुरुष, कारंडी येथील 25 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका, सातारा येथील 23 वर्षीय महिला.
महाबळेश्वर
गोरोशी (बिरवडी) 43 वर्षीय पुरुष.
जावली
णेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, काटवली येथील 61 वर्षीय पुरुष.
फलटण
साखरवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, वडले येथील 54 वर्षीय व 35 वर्षीय पुरुष, होळ येथील 58, 56 व 64 वर्षीय पुरुष, 62, 51 व 45 वर्षीय महिला, तांबवे 45 व 60 वर्षीय महिला, 6 व 3 वर्षीय बालके, 65 व 26 वर्षीय पुरुष.
माण
दहिवडी येथील 19 वर्षीय युवक
यांचा समावेश आहे.
फलटणात एकदम 15 मुक्त
फलटण तालुक्यातील बाधितांचा आकडा 53 इतका होता. तर मंगळवारी एकदम 15 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे उपचार घेणाऱयांची संख्या 6 अशी एकेरी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱयांमध्ये सातारा तालुक्याचा आकडा सर्वाधित 27 इतका आहे. साताऱयात 90 बाधित होते त्यापैकी मंगळवारच्या चौघांसह 59 मुक्त झाले आहेत. चौघांचा बळी गेला आहे.
चार तालुक्यात रुग्ण संख्या एकेरी
जिल्हय़ातील पाटण, महाबळेश्वर, माण व फलटण तालुक्यात उपचार घेत असणाऱयांची संख्या एकेरीवर आली आहे. पाटण तालुक्यात 66 पैकी 7 जणांवर, महाबळेश्वरमध्ये 30 पैकी 6 जणांवर, माणमध्ये 22 पैकी 8 जणांवर तर फलटणात 6 जणांवर उपचार सुरु आहेत.
वेळे येथील बाधिताचा मृत्यू
वाई तालुक्याची रुग्ण संख्या 64 आहे. यापैकी मंगळवारी वेळे येथील 50 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. श्वसनाचा त्रास असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
42 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
रात्री उशिरापर्यंत पुण्याचा अहवाल प्राप्त झाला नसला तरी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलकडून आलेल्या अहवालात 42 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
142 जणांचे अहवाल तपासणीला
मंगळवारी दिवसभरात जिल्हा रुग्णालय 20, कृष्णा हॉस्पिटल 37, कराड उपजिल्हा रुग्णालय 13, फलटण 3, कोरेगाव 8, वाई 12, शिरवळ 18, रायगाव 3, पानमळेवाडी 14, मायणी 11, महाबळेश्वर 4 आणि पाटण 2 असे एकूण 142 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.
पाटणमध्ये दोघांचा संशयित मृत्यू
पाटण तालुक्यात मुंबईहून प्रवास करुन आलेले गोवारे येथील 50 वर्षीय पुरुष तर हावळेवाडी येथील 45 वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला. संशयित म्हणून त्यांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत.
जिल्हय़ात मंगळवारपर्यंत
एकूण कोरोनाबाधित : 745
एकूण कोरोनामुक्त : 562
बळी : 35
आजवर निगेटिव्ह : 8,157
मंगळवारी
एकूण कोरोनाबाधित : 00 (रात्रीचा अहवाल आलेला नाही.)
एकूण कोरोनामुक्त : 29
बळी : 01








