खडकी, पुणे येथे कर्तव्य बजावताना ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने झाला होता मृत्यू
वार्ताहर / खडकी
खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना शुक्रवार (ता.८) रोजी ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या वर्णे (ता.सातारा) येथील जवान हवालदार सचिन विष्णू काळंगे वय ४०) यांच्या पार्थिवावर वर्णे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदल, प्रशासन, पोलिस, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्यावतीने हजारोंच्या उपस्थितीने त्यांना श्रध्दांजली वाहिली. यामध्ये विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी सोपान टोणपे, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डॉक्टर सागर वाघ, मंडलाधिकारी सोमनाथ झनकर, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनंजय शेडगे, तलाठी कोळी व ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
सचिन काळंगे हे सैन्य दलाच्या बाँम्बे इंजनिरीग ग्रुपमधे २००० साली भरती झाले होते. तेव्हापासून त्यांनी सलग २१ वर्षे जम्मू-काश्मिर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, इलाहाबाद, अरूणाचल प्रदेश, सागर (गुजरात) तसेच तीन वर्ष राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार या पदावर सेवा बजाविली होती. काळंगे यांचे बरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील तब्बल सत्तावीस जणांनी भारतीय सैन्यदलात सेवा दिली आहे, देत आहेत. त्यांते पश्चात सैन्य दलातून निवृत्त झालेले त्यांचे वडील विष्णू, बंधू संदीप, पत्नी अश्विनी, बारा वर्षाचा मुलगा प्रेम, दहा वर्षाची कन्या सिध्दि असा परिवार आहे.
त्यांच्या संपूर्ण गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत ग्रामस्थांबरोबर परिसरातिल गावातील ग्रामस्थ, महिला, तरूण वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.