प्रतिनिधी / सातारा
सातारा शहराला ऐतिहासिक महत्व आहे. त्याच साताऱ्याच्या किल्ले अजिंक्यतारा, चार भिंती परिसरात काही विघ्न संतोषी मंडळी चुकीचे कार्य करताना शिवभक्तांच्या निदर्शनास येतात. मंगळवारी सायंकाळी चार भिंती परिसरात दोन जण दारु पित बसल्याचे निदर्शनास आले. शिवभक्तांनी त्या मद्यपींच्या नादाला न लागता त्यांच्याकडून ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य हनन होत असल्याची तक्रार सातारा शहर पोलिसांना दिली. परंतु पोलीस त्या ठिकाणी पोहचलेच नाहीत. पोलिसांची गस्त चार भिंती परिसरात सायंकाळी व्हावी, अशी मागणी होत आहे. धर्मवीर युवा मंचकडून पोलिसांना माहिती दिली गेली होती.
चार भिंती आणि किल्ले अजिंक्यताऱ्यावर साताऱ्यातीलच काही विघ्नसंतोषी मंडळी जावून चुकीचे प्रकार करतात. रविवारीच चार भिंती व किल्याच्या प्रवेशद्वारालगत स्वच्छता करण्यात आली होती. चार भिंतीच्या परिसरात तब्बल दहा पोती दारुच्या, बिअरच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. बाटल्यांच्या काचाही तेवढ्य़ाच पडल्याने आता शिवभक्तांनी या परिसरात जे जे मध्यपी दारु पिण्यास येतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मंगळवारी शिवभक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान दोघेजण ओली पार्टी करत होते.
त्यांचे मद्यप्राशन रंगात आले होते. त्याची ओली पार्टी रंगात आल्याची माहिती धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी सातारा शहर पोलिसांना दिली. मात्र, सातारा शहर पोलीस तेथे पोहचण्यापूर्वीच ते मद्यपी युवक आपला कार्यक्रम करुन निघून गेले. ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपले जात नाही. पोलिसांनी वेळीच जावून त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापुढे पोलिसांना कळवणार नाही तर दांडक्याने फोकळून काढणार
सातारा शहर पोलिसांना कळवूनही पोलीस त्या ठिकाणी जावून कारवाई करत नसतील तर आता आम्ही ऐतिहासिक स्थळांचा वारसा जतन करण्यासाठी एक शिवभक्त म्हणून आम्हाला मद्यपींना फोकळून काढण्यासाठी हातात दांडकी घ्यावी लागतील असा इशारा धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी दिला आहे.









