कास / वार्ताहर :
कास पठाराच्या कुशीत घनदाट वनराईत असलेल्या आदीमाया मायाशक्ती घाटाई देवीच्या मंदिर परिसरात दारू-मटण पार्ट्या रंगू लागल्या आहेत. देवीच्या वनराईत सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच व चुली पेटल्याचे दिसत असल्याने या तिर्थक्षेत्र परिसरातील ओपन बार कोण रोखणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होत आहे.
परळी खोऱ्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गसौदंर्याने नटलेल्या वनराईत निर्जन्यस्थळी घाटाई देवीचे मंदीर असून, देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक दर्शना साठी येत असतात. तर दरदिवशीही अनेक भाविक दर्शनासाठी व पर्यटकही या ठिकाणी भेट देतात. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातुन देवीच्या भव्य मंदीराचा जिर्णोद्वार झाला असून, सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. एकीकडे तिर्थस्थळाचा विकास होत असताना दुसरीकडे मंदीर परिसरातील देवीच्या वनराईत चुली पेटवून मटण-दारूच्या पार्ट्यांना ऊत आला आहे.