शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवभक्तांनी मुक रॅली काढून केला निषेध
प्रतिनिधी/सातारा
पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरटेरच्या डॉ. पेंढारकर हॉस्पिटलच्या समोरील असलेल्या भुयारी मार्गावर छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग हा नामफलक अज्ञाताने फाडल्याने सकाळीच शांत, संयमी साताऱयात तणाव निर्माण झाला. सातारा विकास आघाडीचे कार्यकर्ते अन् शिवभक्त जमा झाले. सकाळी 10 वाजता मुक रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवत शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन शांततेच्या मार्गाने पुन्हा तेथेच नवीन छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग या नावाचा बोर्ड बसवण्याचा निर्धार करुन वातावरण एका तासात शांत झाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कालच अचानक ग्रेड सेपरटेरचे उद्घाटन केले. त्याच ग्रेड सेपरटेरच्या कराड बाजूकडील भुयारी मार्गाच्या नावाचा बोर्ड अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या वेळी फाडला गेल्याची बाब सातार्यात वार्यासारखी सकाळी पसरली. सातारा तालुक्यात ही वार्ता पसरल्याने शिवभक्त तरुण मिळेल त्या वाहनाने पोवई नाक्याकडे येवू लागला. सकाळी 10 वाजता साताऱयाच्या त्या पुलावर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, श्रीकांत आंबेकर, किशोर शिंदे, ऍड. दत्ता बनकर, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे जिल्हाध्यक्ष सतीशबापू ओतारी, अभिजीत बारटक्के, मराठा क्रांती मोर्चाचे शरद जाधव, राम हादगे, धनंजय शिंदे, रणजित माने यांच्यासह कार्यकर्ते जमले.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार सह पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलीस फाटा लगेच नाक्यावर बंदोबस्तासाठी आले. शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचा सुचना सुनील काटकर यांनी करताच सर्वांनी तेथून मुक रॅली शिवतीर्थापर्यंत काढली. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बाळासाहेब ढेकणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सुनील काटकर यांनी जमलेल्या शिवभक्तांना शांततेचे आवाहन करत नव्याने तासाभरात छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग नावाचा बोर्ड बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.











