उपसंचालकांकडे सुविधा देण्याची मागणी
प्रतिनिधी / औंध
ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन दशक उलटले तरी औधच्या ग्रामीण रुग्णालयात सोईसुविधा अभावी रुंग्णाची ससेहोलपट होत असल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोग्य उपसंचालक यांचेकडे औंधच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
सध्या सर्वत्रच कोरोना महामारीचा हाहाकार उडाला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने औंध येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. औंधला सेटर सुरू झाल्यामुळे परिसरातील गावातील लोकांना दिलासा मिळाला. मात्र या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सोईसुविधा अभावी त्यांचा श्वास गुदमरायला लागला होता. हीच बाब ‘दै. तरुण भारत’ने पुढे आणल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी रुग्णालयात सुविधाअभावी रुग्णाची होणारी हेळसांड पाहून आक्रमक भूमिका घेतली आहे.
तब्बेत खालावणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना सुविधा अभावी जीव गमवावा लागत आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आवश्यक उपकरणासह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे रुग्णांची डोकेदुखी ठरत आहे. पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांनी आरोग्य उपसंचालक यांचेकडे औंधच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सोईकरीता व्हेंटिलेटर मशीन, आँक्सिजन मशीन एक्सरे, इसीजी मशीन आदी अत्यावश्यक साहित्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालयातील रिक्त पदे देखील तातडीने उपलब्ध करुन द्यावीत अशीही मागणी केली आहे.
उपसंचालकांची सकारात्मक भूमिका
ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड. सेंटरमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.अत्यावश्यक सेवेकरीता रुग्णांना पुढील उपचारासाठी सातारला हलवावे लागते. यामध्ये काही रुग्णांना देखील जीव गमवावा लागला आहे. लोकांना आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याकरिता आरोग्य उपसंचालक यांचेकडे अत्यावश्यक साहित्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काय साहित्य मिळते ते पाहून पुढील दिशा ठरवू.
– गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा.









