सातारा तालुक्याचा जलजीवनचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा शुक्रवारी घेणार
प्रतिनिधी / सातारा
महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतींना पाठवण्यात आलेली बिले नेमकी कोणत्या महिन्याची आहेत. महावितरणकडेही ग्रामपंचायतीचे येणे आहे. असे असताना नेमकं कोणतं बिल भरायचे. अखंड बिल भरता येणार नाही, अशा शब्दात महावितरणच्या अभियंत्यांना पंचायत समितीच्या सदस्यांनी धारेवर धरले. जलजीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे सातारा पंचायत समितीत शुक्रवारी येणार आहेत.
सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती सरिता इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती अरविंद जाधव, गटविकास अधिकारी सुर्वणा चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद कदम, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, रामदास साळुंखे, वसुंधरा ढाणे, विद्या देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद कदम यांनी ग्रामपंचायतींना आलेली बिले नेमकी किती भरायची याचा कुठे आम्हाला जिल्हा परिषदेतून आदेश नाही. तुम्ही मात्र बिले ग्रामपंचायतींना दिलेली आहेत. खेडला कोटय़ावधी रुपयांचे बिल आहे ते आम्ही भरु शकत नाही. चालू बिल मिटर रिडींग काय असेल ते आम्ही भरु परंतु तसा आम्हाला जिल्हा परिषदेकडून आदेश पाहिजे, अशा शब्दात महावितरणच्या अभियंत्यांना जाब विचरत धारेवर धरले. एसटीच्या आढाव्या वेळी 100 टक्के सातारा आगाराच्या बसेस सुरु आहेत.
असे सांगताच शहरालगतच्या बसेस सुरु करा अशी विनंती करताच त्या आताच करता येत नाहीत, असे सांगितले. बांधकाम विभागाच्या आढाव्यावेळी रामदास साळुंखे यांनी कोडोली येथील रस्त्याची कामे कशा पद्धतीने झालेली आहेत याची सर्व माहिती अभियंता प्रशांत खैरमोडे यांना विचारणा केली. पाणी पुरवठा योजनेचा आढावा मांडताना सभापती सरिता इंदलकर यांनी कोणतेही गाव या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन केले. यावेळी अभियंत्यांनी उद्या सातारा तालुक्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे सातारा पंचायत समितीत येणार आहेत, असे सांगितले.









