ग्रामस्थांचे पूर्णतः सहकार्य, इनामदार यांच्या वाड्यात सुरू आहे चित्रीकरण, कडेगाव विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत कार्यलयाचा चित्रीकरणासाठी वापर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते काळजी
सातारा /प्रतिनिधी
वाई तालुक्यातील वेलंग गावची अंगणवाडी सेविका मंगल जेधे यांच्या खूनाच्या घटनेनंतर धोम येथील डॉ.संतोष पोळ याचे क्रूर कारनामे वाई पोलिसांनी त्यावेळी उघडकीस आणले. सध्या डॉ.पोळ हा कारागृहात असून याच सत्यघटनेवर आधारित झी मराठी या वाहिनीवर देव माणूस ही धारावाहिक मालिका 1 ऑक्टोबरपासून सुरू आहे.या मालिकेचे चित्रीकरण वाई तालुक्यातील कडेगाव येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे.ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.
पंधरा ते सतरा वर्षांपूर्वी वाई तालुक्यातील पश्चिम भाग अतिशय मागास होता.कोणतीही आरोग्य सुविधा नव्हती.त्याच काळात डॉ.संतोष पोळ याची ओपीडी गावागावात सुरू होती.त्याने त्यावेळी केलेली काळी कृत्ये ही वेलंग गावची अंगणवाडी सेविका मंगल जेधे हिचा खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावल्यावर उघडकीस आले.अतिशय चाणाक्ष असलेल्या संतोष पोळ यांनी मारलेल्या महिलांचे डेड बॉडी त्याने त्याच्या फार्म हाऊस परिसरात, ओपीडी परिसरात पुरल्याचे पोलिसांनी शोधून काढले.सध्या तो डॉ.पोळ हा कारागृहात आहे.मात्र, त्याच्या कथा वाई तालुक्यात पश्चिम भागात चांगल्याच त्यावेळी रंगत होत्या.याच सत्यकथेवर आधारित असलेली झी मराठी या वाहिनीवर मालिका सुरू आहे.
विशेष म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण वाई तालुक्यातच होत आहे.वाई पासून आठ किलोमीटरवर असलेल्या कडेगावात ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरण सुरू झाले आहे.ज्या वेळी कोरोनाचा कहर जोरात सुरू होता त्याच वेळी सर्व नियम पाळून ग्रामस्थांच्या सहकार्याने या गावात चित्रीकरण सुरू झाले.गावचे नेते बाळासाहेब दुधे-पाटील यांच्या विचाराने गाव चालते.त्यामुळे येथे त्यांच्या विचाराने विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय चित्रीकरण करण्यासाठी वाटेल तेव्हा देण्यात येते.इनामदारांचा जुना पडका वाडा आहे.त्या वाड्यात डॉक्टरचा दवाखाना दाखवला आहे.या चित्रीकरणाला साजेसे कडेगावात वातावरण असल्याने चित्रीकरण निरव शांततेत सुरू असते.
या मालिकेतल्या पात्रांना भेटून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते कडेगावला भेट देऊ लागले आहेत.किमान डॉक्टर नाही भेटले तर डिंपल तरी भेटेल, टोण्या तरी भेटेल या आशेने वाई तालुक्यातील चाहते कडेगावला भेट देत आहेत.चित्रीकरण सुरू असलेला वाडा पाहत तेथील ठिकाणांचे फोटो काढत आहेत.भेट देणारे चाहते डॉक्टराच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला ही भितात.मालिकेत दाखवले गेलेल्या रुपाला अंगणातल्या कठड्यात ठेवले असून त्या कठड्याचा फोटो काढण्यात चाहते धन्य मानत आहेत.ग्रामस्थ आणि चित्रीकरण स्थळावरचे कामगार बाहेरून येणाऱ्यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहेत.









