सातारा / प्रतिनिधी :
सातारा पंचायत समितीचे सदस्य हणमंत गुरव यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वच पंचायत समितीच्या सदस्यांनी स्वखुशीने मदत करण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला. दरम्यान, पंचायत समितीला नवीन इमारत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचेही यावेळी ठरले. तसेच विविध विभागांच्या आढाव्यादरम्यान साधकबाधक चर्चा झाली.
पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी सुरेखा चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, रामदास साळुंखे, दयानंद उघडे, मिलिंद कदम, वसुधंरा ढाणे, संजय घोरपडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
बांधकाम विभागाच्या आढाव्यावेळी रामदास साळुंखे यांनी एमआयडीसीत रस्त्याच्या कामांमुळे उडणारी धूळ थांबविण्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली. तर शिक्षण विभागाच्या आढाव्यात ग्रामीण भागात नेमके किती शिष्यवृत्तीधारक आहेत, याची माहिती द्या, अशी मागणी त्यांनी केल्यावर मिलिंद कदम आणि रामदास साळुंखे यांच्यात जुंपली.
गुुुरव यांच्या जाण्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. मुलगी शिक्षण घेत आहेत. त्यांची आई वैद्यकीय उपचार घेत आहे. उपचाराकरता कर्ज घेतले होते. ते कर्ज तसेच आहे. त्यांना पंचायत समिती सदस्यांकडून स्वेच्छेने मदत करु, असे आवाहन राहुल शिंदे यांनी केले.
दरम्यान, पंचायत समितीला जुनी इमारत आहे. नवीन इमारत गोडावूनच्या जवळ व्हावी, यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. आमदार शिवेंद्रराजे हे सहकार्य करणार आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींकडे आपण विनंती करुया, जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देवू, अशी विनंती सभापती सरिता इंदलकर यांनी यावेळी केली.









