प्रतिनिधी / उंब्रज
राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असताना खुलेआम सुरू असलेली गुटख्याची वाहतूक रोखण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शुक्रवारी यश आले होते. कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघां संशयितांना पोलिसांनी जेएमएफसी कोर्ट कराड येथे हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी वैभव रविंद्र पानसकर वय ३१, ओंकार अरुण देशपांडे वय ३१, दोघेही राहणार शनिवारी पेठ सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करुन शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले.
शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्गावर तासवडे टोलनाक्यानजीक एका हॉटेल समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका कारमधून ३ लाख ३७ हजारांचा गुटख्यासह ६ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच वैभव पानसकर व ओंकार देशपांडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.
दरम्यान गुटखा बंदी असताना जिल्हात सुरू असलेल्या अवैध गुटख्याचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. कारमधून होणारा लाखो रुपये किमंतीचा गुटखा पोलिसांनी तासवडे टोलनाक्यानजीक एका हॉटेलसमोरुन ताब्यात घेतला तसेच सातारा येथेही अन्य एक कारवाई करण्यात आली आहे.
सदर गुटखा प्रकरणी शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई नंतर अन्न औषध प्रशासनाने तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर संशयितांनी सदरचा गुटखा कर्नाटक येथून आणून तो विक्रीसाठी कराड येथे ठेवल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले. तसेच त्यांच्याकडे इतर माहिती, खरेदी बीले, कोणतीही कागदपत्रे संशयितांकडे नव्हती असे पोलिस सुत्रांनी सांगितले असून गुटखा वाहतूक विक्री या अनुषंगाने पोलिसांनी कसुन चौकशी सुरू केली आहे.









