गोडोली / प्रतिनिधी :
ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच निवड झाल्यानंतर ४५ दिवसात गाव स्तरावर विविध समित्या ग्रामसभेतून स्थापन कराव्या लागतात. गाव विकासासाठी योगदान देणाऱ्या समित्या म्हणजे गावचे मंत्रीमंडळ असून, सर्व समित्यांचे अध्यक्ष सरपंच असणार आहेत. जुन्या समित्या बरखास्त झाल्या असून, नव्याने सर्व समित्या स्थापन करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे सरपंचांचे असून त्या न केल्यास ते अपात्र ठरणार आहेत.
अधिनियमातील तरतुदीनुसार गाव पातळीवरील सर्व समित्यांचे अध्यक्ष सरपंच असून ग्रामसेवक सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सरपंचांकडे समितीचे अध्यक्ष पद असले तरी या समितीच्या एकुण सदस्यांपैकी १/२ पेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्य, एकुण सदस्यांमध्ये १/३ पेक्षा कमी नसतील एवढे ग्रामपंचायत सदस्य, अनुसूचित जाती जमातीचे सदस्य आणि समितीच्या विषयात जबाबदारीने स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या व्यक्तींची निवड आणि समितीची कामे ग्रामसभेतून ठरवली जाणार आहेत.
प्रत्येक समितीत किमान १२ ते जास्तीत जास्त २४ सदस्य असू शकतात.जुन्या सर्व समित्या बरखास्त झाल्या आहेत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार आणि शासनाने विविध कामासाठी निर्देशित केलेल्या सर्व समित्या आता नव्याने स्थापन कराव्या लागणार आहेत.
ग्रामपंचायतीत सह्या करण्यासाठी नाही तर जबाबदारी घेऊन गावाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक सदस्याने एका तरी कामाची जबाबदारी घेतल्यास त्यांचेही महत्त्व वाढणार आहे. सरपंचांनी सक्षम नेतृत्व आणि सदस्यांनी प्रभावीपणे नियोजन, जबाबदारी, अंमलबजावणीत योगदान देण्याची पाच वर्षे विश्वस्त म्हणून मोठी संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाएवढा या समितींचा कार्यकाळ असतो.









