भाज्यांची आवक घटल्याने कडधान्यांची वाढली मागणी
सातारा / प्रतिनिधी
सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असून सर्वत्र फळभाज्यांसह फुलांची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनमुळे फुले व भाज्यांचे दर चांगलेच वाढले असून सामान्यांना ते खरेदी करणे न परवडणारे आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात म्हणावी तशी भाज्यांची आवक होताना दिसत नाही. आवक कमी असल्याने फळभाज्या, फुले यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सणासुदीच्या काळात दर आटोक्याबाहेर गेल्याने कडधान्यांवरतीच समाधान मानावे लागत आहे.
दरवर्षीपेक्षा यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी होत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. शहरातील बाजारपेठेत काही प्रमाणात फुल व फळांची रेलचेल आहे. मंगळवारी महालक्ष्मीची स्थापना झाल्याने बाजारात खरेदीचा जोर वाढला होता. घरोघरी पूजेसाठी फुलांची मागणी वाढली आहे. मात्र, जिह्यात फुलशेती कमी प्रमाणात होत असल्याने बाजारात इतर राज्यातून फुलांची आवक होत आहे. सजावटीच्या फुलांचे दर जास्त वाढले आहेत.
बाजारात पुणे, कोल्हापूर व जिह्याच्या आसपासच्या गावातून विविध फुले विक्रीसाठी येतात. परराज्यातूनही मोठया संख्येने फुले पाठवली जातात. यामध्ये झेंडू, गुलाब, निशिगंधा, शेवंती आदीची नेहमी मागणी बाजारात असते. गणेशोत्सवामुळे सध्या फुलांची मागणी दुप्पट झाली आहे. सध्या शेवंतीचे दर 300 ते 400 रूपयांच्या घरात आहेत. तर फुलांच्या हारांच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. सातारच्या बाजारपेठेमध्ये सफरचंद, संत्री-मोसंबी, केळी पेरू, चिकू इत्यादी फळांना देखील मागणी वाढली आहे.
याशिवाय भाज्यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. शेतात भाज्यांची लागवड सूरू असल्याने केवळ 20 टक्के भाजीपाला जिह्यातून येत असून उर्वरित 80 टक्के भाजीपाला परराज्यातून येत आहे. हिरवी मिरची घाऊकमध्ये 60 रूपये असून किरकोळ दर शंभर रूपये किलो आहे. इतरवेळी 10 रूपये किलो मिळणारी वांगी सध्या 30 रूपये किलोवर पोहचली आहे. टोमॅटो 40, कोबी 20, कारले 20 तर शिमला मिरची 30 रूपये किलो तर शेपू भाजी 30 रूपये नगाप्रमाणे मिळत आहेत. पुढील महिन्यात भाज्यांचे दर असेच तेजीत असतील असे विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे.