सातारा / प्रतिनिधी :
गडकिल्ल्यांच्या परिसरात नवीन वर्षाच्या पूर्वंसंध्येला विघ्नसंतोषी मंडळी दारू पार्ट्या करून गडकिल्ल्यांचे पावित्र्य हनन करण्याची शक्यता असते. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या परिसरात तीन दिवसांकरीता पोलीस चौक्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी शिवभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा शहर पोलिसांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी केला. निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात 26 हून अधिक गडकिल्ले आहेत. अजिंक्यतारा, कमळगड, कल्याणगड, केंजळगड, चंदनगड, जंगली जयगड, गुणवंतगड, दातेगड, प्रतापगड, पांडवगड, भैरवगड, भूषणगड, मधूमकरंदगड, महिमंडणकर, महिमानगड, संतोषगड, वर्धनगड, वसंतगड, वारुगड, वैराटगड असे गड आहेत. गडकोट ही आपली संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच स्वराज्य उभं केलं.
गडकिल्ले ही स्वराज्याची शान आहे. या किल्यांच्या संवधर्नासाठी शिवभक्त व शिवकन्या कार्य करत आहेत. मात्र, काही विघ्नसंतोषी मंडळीकडून नवीन वर्षाच्या मध्यरात्री गडकिल्यांच्या परिसरात ओली पार्टी करतात. गडांचे पावित्र्य हनन करतात. असे प्रकार होवू नयेत, म्हणून दि.30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत गडाच्या परिसरात पोलीस गस्त व चेक नाका सुरु करण्यात यावे. गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी त्या दिवशी करण्यात यावी. तसेच तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.









