शाहूपुरी : कोरोना काळात मागील आठ महिन्यांपासून रखडलेल्या अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली आहे. या रुग्णांनी अन्य शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दिवसाला दीडशे पार झाली आहे. त्यामुळे यापूर्वी रखडलेल्या शस्त्रक्रिया करण्याठी रुग्णांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ॲपेंडिक्स, पोटाच्या शस्त्रक्रिया, हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण तारीख घेत आहेत.
आठ महिन्यांपूर्वी लॉकडाऊन झाले. त्यावेळी केवळ कोरोनारुग्णांची संख्या वाढत होती. अन्य आजारांचे रुग्ण अत्यंत कमी होते. अपघात तर पूर्णपणे थांबले होते. अनेकांनी कोरोनाच्या धास्तीने गंभीर आजारही अंगावर काढले. कोरोना कधी संपतोय, याची अनेक रुग्ण वाट पाहत होते. मात्र, कोरोना संपण्याऐवजी वाढतच आहे. आता तर कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये इतर शस्त्रक्रिया रखडल्या जाऊ नये, म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.









