राजवाडा येथील कोयता हल्ला : जमिनीच्या वादातून घटना
सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटीसमोर मंगळवारी दुपारी सुधीर देसाई यांच्यावरील कोयता हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात राजू अनिल भोसले, संतोष अनिल भोसले व दोन अनोळखींवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
याबाबत सुधीर किसन देसाई वय 47, रा. कारंडबी चौकीजवळ, मंगळवार पेठ, सातारा मूळ रा. पुनवडी, ता. सातारा यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान राजवाडा चौपाटीसमोर असलेल्या प्रिया टायपिंग झेरॉक्स दुकानासमोर चौघांनी कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जमिनीच्या वादातून राजू अनिल भोसले, संतोष अनिल भोसले व दोन अनोळखी युवकांनी हा हल्ला केल्याची तक्रार देसाई यांनी दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जमिनीच्या वादातून देसाई व भोसले यांच्यात वाद होता. त्यातूनच हा प्रकार घडला असून देसाई यांच्या दोन्ही पायावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी अपर पोलीस अधिकारी धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत असून संशयित फरारी झाले आहेत.