प्रवासी नसल्याने ओढवले आर्थिक संकट प्रशासनाने मदतीचा हात देण्याची मागणी
प्रतिनिधी / सातारा
लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक करणार्या परवानाधारक व खाजगी प्रवासी गाडय़ा गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने या गाडीमालक व चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या वाहन चालकांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी, शासनाने तातडीने लक्ष घालून या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी. तसेच नियम घालून या व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांमधून केली जात आहे.
लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, प्रवासी वाहतूक अद्यापही बंद असल्यामुळे वाहनचालकांसह मालक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत. खाजगी वाहनांची संख्या वाढल्याने काही वर्षापासून हा व्यवसायिक तोटय़ात आहेत. चार दिवस थांबल्यावर एखादे भाडे मिळत आहे. त्यातच कोरोनाची भर पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बहुतांशी वाहनचालकांनी आपल्या गाडय़ा बँका, पतसंस्था व इतर फायनान्स कंपन्याकडून कर्जावर घेतलेल्या आहेत. हा व्यवसायच सहा महिने ठप्प असल्याने कंपन्यांनी आता कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. परंतु, धंदाच बंद असल्यामुळे या व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. यासाठी बर्याच चालकांनी शेती, भाजीपाला, बिगारी व इतर व्यवसायाचा मार्ग अवलंबला आहे. पण, कोरोनामुळे हेही व्यवसाय अडचणीत आहेत. त्यामुळे मोठय़ा आर्थिक संकटाला या व्यवसायिकांना सामोरे जावे लागत आहे.
या वाहनांची चाके गेले सहा महिन्यांपासून थांबली असल्याने पूर्णत: वाहतूक व्यवसायावर अवलंबून असणार्या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने या व्यवसायिकांचा विचार करून काही अटी शिथील कराव्यात व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.