● गुरुवारी रात्री 828 एवढे बाधित
● जिल्हय़ात 13 बाधितांचा मृत्यू
● पुणे, मुंबईला बेड उपलब्ध करा
● कराड, साताऱयात वाढ चिंताजनक
● इतर तालुक्यात बाधितांची वाढ सुरुच
● बेडअभावी अनेकांची होतेय फरफट
● पालकमंत्र्यांकडून स्थितीचा आढावा
● पत्रकारांसाठी कोविड सेंटरची मागणी
प्रतिनिधी/सातारा
जिल्हय़ात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना कधी आटोक्यात येणार हाच प्रश्न सध्या जिल्हावासियांना छळतोय. तसे पाहिले तर 90 टक्के जिल्हावासीय प्रशासनाचे नियम पाळत आहेत. मात्र तरी देखील बाधितांची संख्या कशी वाढत आहे हा सामान्य सवाल नागरिकांच्या मनात असून बळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा होणारा समावेश त्यांच्या नातेवाईकांना गोंधळात टाकत आहे. अनेकांना बेडस उपलब्ध होत नसल्याच्या घटना घडत असून दुसरीकडे बाधितांची मोठी संख्या अंगावर काटाअसतानाच गुरुवारी कोरोना मुक्तीचा आलेख एकदम उंचावला आणि जिल्ह्यातील 870 जणांनी कोणावर मात केल्याची दिलासादायक बातमी प्रशासनाने दिली. हा रिकव्हरी रेट चांगला असला तरी वाढणारा मृत्यूदर रोखण्याचे आव्हान जिल्हय़ासमोर आहे.
*दिलासा : 870 जण कोरोनामुक्त*
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा 713 जणांचा अहवाल बाधित आला असून गुरुवारच्या अहवालात 13 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आलीय. तर गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 828 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला. तर जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून गुरुवारी संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*बेडच्या माहितीसाठी ॲप निर्माण करा : पालकमंत्री*
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक अॅप तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी केल्या. छत्रपती शिवाजी संग्रहालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय लवकर उपचारासाठी वापरात येईल यासाठी कामांचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना द्यावी, असेेही मंत्री पाटील यांनी सांगितले
*पुणे, मुंबईला बेड उपलब्ध करुन द्या : मंत्री शंभुराज देसाई*
जिल्हयातील शासकीय रुग्णालये, शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन, व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत. कोरोना रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकांच्या रुग्णालय, जंबो कोवीड फॅसिलिटी सेंटरमध्ये सातारा जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे आवश्यक बेड उपलब्ध करुन दयावेत, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलीय.
*पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची मागणी*
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उपलब्धता करावी व जिल्ह्यातील पत्रकारांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाने केल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातार्यात पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्याची ग्वाही दिली. सातारा, कराड, फलटण, वाई या मोठ्या शहरांमध्ये किमान प्रत्येकी 15 बेडचे कोविड केअर सेंटर तर कोरेगाव, वडूज, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, खंडाळा, मेढा येथे किमान 5 बेडचे कोविड केअर सेंटर पत्रकारांसाठी तयार करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*जिल्ह्यातील लोकांना भीतीमुक्त करा*
एकीकडे अनलॉक 4.0 मध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, मंदिर, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद असली तरी हॉटेल, लॉजिंगला सुरु झालीत तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु झाली असून सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत मार्केट सुरु आहे. तर दुसरीकडे कोरोनाची वाढती संख्या गंभीर स्थिती नागरिकांमध्ये भीतीही निर्माण करत आहे. मोठय़ा प्रमाणावर बाधित येत असले तरी त्यामध्ये 80 टक्के बाधितांना कोणतीच लक्षणे नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हा प्रशासन सांगत असले तरी मग दुसरीकडे जिल्हय़ात बेडस उपलब्ध होत नाहीत. जे ज्येष्ठ नागरिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातात त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना बळी म्हणून घोषित करण्यात येत आहे. लोकांना भीतीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
*नागरिकांचे सहकार्य आहेच, त्यांची काळजी घ्या*
मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सातारा जिल्हावासियांनी प्रशासनाचे सर्व नियम पाळलेले आहेत. ऑगस्टपर्यंत या सर्व परिस्थितीचा विपरित परिणाम अर्थ व्यवस्थेसह जनमाणसावर झालेला आहे. तरीही नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असून प्रशासनाने त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. वातावरण पॅनिक होत असून त्यातील नेमकेपणा समोर आला तर नागरिकांना देखील कोरोना विरुध्द लढय़ात प्रशासनाला साथ देणे सोपे जाईल. नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ई पास बंद झाले व सगळे अनलॉक झालेले असले तरी सध्या साताऱयात स्थिती गंभीर असून सातारला येवू नका, असे नागरिक सातारला येवू इच्छिणारांना सांगत आहेत.
*जिल्हय़ात 13 बाधितांचा मृत्यू*
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आवर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय महिला, खटाव 65 वर्षीय पुरुष, कोंडवे 60 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर खंडाळा 75 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी ता. वाई 47 वर्षीय पुरुष, चंचळी, ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव 42 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव 57 वर्षीय महिला, कटापूर ता. कोरेगाव 57 वर्षीय पुरुष, उचिले ता. खटाव 50 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये संभाजीनगर, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, राहोळी ता. वाई 75 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 67 वर्षीय महिला असे एकूण 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
*682 जणांचे नमुने तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76, पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49, खावली 41, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
*गुरुवारपर्यंत जिल्हय़ात*
एकूण नमुने 47357
एकूण बाधित 16788
एकूण मुक्त 9021
मृत्यू 443
उपचारार्थ रुग्ण 7324
*गुरुवारी जिल्हय़ात*
एकूण बाधित 828
एकूण मुक्त 870
एकूण बळी 13
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









