गृहिणींचा घरात मोदक बनवण्यावर भर
गव्हाच्या पीठाचे, उकडीच्या मोदकांना पहिली पसंती
प्रतिनिधी / सातारा
गणेशोत्सव म्हटलं की, गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य असतोच. घरगुती गणपतीपासून ते अगदी मोठया गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने मोदकांचा नैवेद्य चढवितात. यंदा कोरोनामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांना ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षी दोन ते तीन दिवस आधीच मोदक खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडते. गव्हाच्या पीठाचे मोदक, उकडीचे मोदक घरा-घरात बनवले जातात. परंतु खव्याचे, चॉकलेट, स्टॉबेरी, अक्रोड, गुलकंद, खजूर अशा विविध प्रकारचे मोदकांनी मिठाईची दुकाने भरून जातात. या मोदकांची दरवर्षी चांगली मागणी वाढलेली असते. नुकताच शनिवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून मिठाईच्या दुकांनामध्ये मोदक विक्रीसाठी तयार आहेत. मात्र, खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. यंदा मोठया मंडळांनी आपले गणेशोत्सव रद्द केले आहेत. तर काही मंडळे अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरी करत आहेत.
बाप्पाच्या दर्शनाला एकमेकांच्या घरीही जाणार नसल्याचे चित्र आहे. जिह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून यांची धास्ती पहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी करणाऱया महिलावरील कामाचा ताण कमी झाल्याने त्याही बाप्पासाठी वेगवेगळया प्रकारचे मोदक बनवत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत 50 टक्केच मोदकांची विक्री झाली असल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.