13 ते जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत ‘देऊळ बंद’
वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेव येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातील 27, 28 व 29 रोजी पौष पौर्णिमेला देवीची मुख्य यात्रा आहे. ही जत्रा जवळपास महिनाभर चालते. दरम्यान, 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी मंदिरही बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशांनुसार यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा रुढी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिल्या आहेत.
यात्रा कालावधीत मांढरगडावर सात ते आठ लाख भाविक येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसाठी प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मांढरदेव येथील यात्रा रद्द करण्याबाबत पूर्व नियोजन बैठक घेऊन मंदिर पुजारी, स्टॉलधारक व मांढरदेव ग्रामस्थ, देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.









