प्रतिनिधी / सातारा
राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार कोरोनाच्या अनुषंगाने दक्षता घेण्यासाठी जिल्हा परिषदेची सभा व्हीसी द्वारेच घेण्यात येणार आहे. ही सभा बुधवार दि. 9 रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनीच दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीवरच घेतली जात असून जिल्हा परिषद सदस्यांना त्या त्या तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहात व्हीसीची सोय करण्यात आली आहे.
कोरोना आल्यापासून प्रत्येक जण काळजी घेत आहे.कोरोना होऊ नये, त्यापासून बचाव होईल कसा हे पहात आहेत. मात्र, किती ही काळजी घेतली तरी थोड्याशा निष्काळजीपणामुळे कोरोना आपला डाव साधत आहे. अनेकांचे जीव कोरोना घेत आहे. कोरोनापासून बचाव होण्याच्या अनुषंगाने राज्य शासनानेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभा ह्या व्हीसीवरच घ्या, असे परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव संतोष कराड यांनी 25 ऑगस्ट रोजी पत्र काढले आहे. त्या पत्रानुसार सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे दि. 9रोजी आयोजित करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या सभागृहात पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यासाठी सोय केली आहे. तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांकरता त्या त्या पंचायत समितीच्या सभागृहात सोय केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोना आल्यापासून गेल्या एक महिन्यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि अर्थ विभागातील लिपिकास कोरोना झाला होता. ते कोरोनामुक्त होतात तोच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, दीपक पवार, माजी कृषी सभापती मनोज पवार यांनाही बाधा झाली होती. तसेच पाटण तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, वाई तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या सदस्यास कोरोनाची बाधा झाली होती. तसेच जिल्ह्यात दोन गटविकास अधिकारी, एक अभियंता, एक आरोग्य विभागाचे कर्मचारी, रोजगार हमी योजना विभागातील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीवरच होत आहे.









