जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांची माहिती
प्रतिनिधी / सातारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. हे समजून सांगण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने दि.15 रोजी सकाळी 11 वाजता किसान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते की प्रत्येक गोष्ट प्रतिक्षा करू शकते पण शेती नाही. मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षढयंत्र रचले आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उधोगपतीचे गुलाम बनवण्याचे मोठे षढयंत्र आहे.
आज देशातील 62 कोटी शेतकरी व कामगार आणि 250 पेक्षा अधिक शेतकरी संघटना या काळ्या कायद्याच्या विरोध करत आहेत. पण पंतप्रधान व त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करून देशाची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे दूरच राहिले शेतकऱ्यांचे संसदेतले प्रतिनिधी असलेल्याचा ही आवाज बंद केला आहे आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर लाठीमार केला जात आहे. संविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या धाब्यावर बसवून कोणतीही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताने काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत. राज्यसभेत तर लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.15 रोजी सकाळी 11 वाजता किसान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत, असे डॉ.जाधव यांनी सांगितले.









